वादळी वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळून दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:42 AM2021-05-18T04:42:20+5:302021-05-18T04:42:20+5:30

कल्याण /मुंब्रा : कल्याण-शीळ रस्त्यावर वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे देसाई खाडीपुलाजवळ जाहिरातीचा लोखंडी फलक टेम्पोवर पडल्याने सचिन चव्हाण आणि छगन ...

A billboard collapsed due to strong winds, injuring two | वादळी वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळून दोन जखमी

वादळी वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळून दोन जखमी

Next

कल्याण /मुंब्रा : कल्याण-शीळ रस्त्यावर वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे देसाई खाडीपुलाजवळ जाहिरातीचा लोखंडी फलक टेम्पोवर पडल्याने सचिन चव्हाण आणि छगन चौधरी हे ठाण्याजवळील विटावा गावात राहणारे टेम्पो चालक आणि क्लिनर जखमी झाले. अग्निशमन दलाचे जवान वेळीच पोहोचल्याने दोघांचे प्राण वाचविण्यात यश आले. या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले आहे, तसेच इतर घटनांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड पडून रिक्षाचे, तर पत्रा उडून एका घराचे नुकसान झाले.

रविवार रात्रीपासून वादळी वारा सुरू होता. सोमवारी सकाळी पुन्हा वाऱ्याचा जोर जास्त होता. यामुळे कल्याण-शीळ रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोवर एक जाहिरातीचा लोखंडी फलक कोसळला. त्यामुळे चालक आणि क्लिनर अशा दोन व्यक्ती त्याखाली दबल्या जाऊन आत कोंडल्या गेल्या. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलास पाचारण केले. डोंबिवली अग्निशमन दलाचे अधिकारी नंदकुमार शेंडकर यांनी घटनास्थळी पोहोचून कटरच्या साहाय्याने टेम्पो चालकाच्या केबिनचा पत्रा कट करून दोघांना बाहेर काढले. अग्निशमन दल वेळीच पोहोचल्याने दोघांचे प्राण वाचले. जखमी झालेल्या त्या दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रस्त्यावरील लोखंडी जाहिरातीचे फलक जीवघेणे ठरू शकतात, ही बाब अनेक घटनांमुळे समोर आली असली, तरी जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या हव्यासापोटी त्यांना परवानगी दिली जात असल्याचे यातून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

- रिक्षासह घराचे नुकसान

जोरदार वाऱ्यामुळे कल्याण पश्चिमेतील वर्टेक्स या बहुमजली इमारतीच्या गच्चीवरील शेडचा पत्रा उडून लांबवर पडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेचा लाइव्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दुधनाका परिसरातील रिक्षावर वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून रिक्षाचे नुकसान झाले आहे. मोहने परिसरातही झाड पडले आहे. कल्याण पूर्व भागात लोकग्राम परिसरातील एका घराचा पत्रा वाऱ्याने उडून गेल्याने घराचे नुकसान झाले आहे.

---------------------

Web Title: A billboard collapsed due to strong winds, injuring two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.