निकृष्ट कामे करून लाटली कोट्यवधींची बिले; ग्रामीण रस्ते विकास संस्थेचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 03:21 AM2020-01-13T03:21:15+5:302020-01-13T03:21:26+5:30
तक्रारींना केराची टोपली
नारायण जाधव
ठाणे : पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे आयुष्य पाच वर्षे असूनही अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनेक ठेकेदार निकृष्ट कामे करून दरवर्षी सरकारच्या कोट्यवधींच्या निधीची लूट कोकणात करत आहेत. यात बहुसंख्य कामे पाच वर्षांत एकदा न काढता ती वारंवार सुरू आहेत.
याबाबत, काही ठेकेदारांसह स्थानिकांनी तक्रारी करूनही त्यांची दखल न घेता ठाणे, अलिबाग आणि परीक्षण करणाºया पुणे येथील अधिकाºयांनी आपसात संगनमत करून या सार्वजनिक लुटीला उघडउघड पाठिंबा दिला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत कोकणात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या कामांचे मेजरमेंट बुक तपासून त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडिट केल्यास कोट्यवधींची लूट चव्हाट्यावर येण्यास मदत होईल.
निकृष्ट कामांचे उदाहरण द्यायचे झाल्यास सरफळेवाडी ते वडाचीवाडी हा २३०० मीटरचा रस्ता चांगला असूनही ठेकेदाराने डब्ल्यूबीएमचे चार थर टाकण्याचे बंधन असतानाही थेट बीबीएम करून १८ लाखांचे बिल लाटले होते. याबाबत, स्थानिकांसह पत्रकारांनी आवाज उठवूनही त्याची दखल घेण्यात आली नव्हती. अशाच प्रकारे पेण तालुक्यातील बोरगाव ते धनगरमाळ या रस्त्याच्या दर्जाच्या गुणवत्तेच्या चौकशीची मागणी तेथील भाजपचे कार्यकर्ते नागेश जगताप यांनी करूनदेखील अलिबाग येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी तिची दखल घेतली नाही. पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील १८ रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी साइट व्हिजिट करण्यात आली. परंतु, यातून रोहा तालुक्यातील मुचणे रस्त्याला हेतुपुरस्सर वगळण्यात आले.
रत्नागिरीत लाटले सात कोटी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली सर्कलमध्ये येणाºया खेड तालुक्यातील बेरळ-बोरज-कोंडिवली या ११ किमी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आले. मात्र, या कामाची तपासणी न करताच सात कोटींचे बिल देण्यात आले. विशेष म्हणजे या रस्त्याच्या बांधकामात समाविष्ट असणाºया ७२ मोºयांचे काम हे फाउंडेशन न करताच करण्यात आले. शिवाय, या रस्त्याच्या कामात हाताने डांबर मारण्यात आले. यामुळे या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होऊन त्याचा बराचसा भाग पावसाळ्यात वाहून गेला.