'कंत्राटदाराच्या हितासाठी कोट्यवधींचा खर्च'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:33 AM2018-11-01T00:33:03+5:302018-11-01T00:33:20+5:30
१५ दिवसांत डम्पिंग न हटवल्यास आंदोलनाचा दिला इशारा
उल्हासनगर : खडीखदाण येथील डम्पिंगमुळे ५० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. १५ दिवसांत डम्पिंग हटवण्याचा इशारा ‘कायद्याने वागा’ संघटनेने दिला. डम्पिंगवर कोट्यवधींची उधळण कंत्राटदाराच्या हितासाठी केली जात असल्याचा आरोप राज असरोंडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
उल्हासनगर कॅम्प नं.-५, खडीखदाण येथील डम्पिंगला सतत आग लागत असल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. तसेच दुर्गंधीने नागरिक त्रस्त होऊन अनेकांनी स्थलांतर सुरू केले. डम्पिंगवरील दुर्गंधी कमी करण्यासाठी महापालिकेने बायोतंत्रज्ञानाचे कंत्राट एका खाजगी कंपनीला २२ लाखांना दिले. मात्र, अद्यापही दुर्गंधी कमी झालेली नाही. उलट, डम्पिंगला आग लागून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नगरसेवक सतरामदास जेसवानी यांच्यासह इतर नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन करून डम्पिंग हटवण्याची मागणी केली. मात्र, महापालिकेकडे पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने डम्पिंग सुरूच ठेवण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, १५ दिवसांत डम्पिंग हटवले, नाहीतर आंदोलनाचा इशारा असरोंडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. डम्पिंगवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.
डम्पिंग हटवणे अशक्य :महापालिकेकडे डम्पिंगसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने शहरातील रोजचा ४१० टन कचरा कुठे टाकायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. म्हारळ गावाशेजारील राणा खदाण ओव्हरफ्लो झाल्याने बेकायदा खडीखदाण येथे डम्पिंग हलवण्यात आले. पर्यायी जागेशिवाय डम्पिंग हटवणे अशक्य असल्याचे मत अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.