ताबा पावती वसुलीत कोट्यवधींचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:31+5:302021-09-08T04:48:31+5:30
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत रोज शेकडो फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे. परंतु पालिका या फेरीवाल्यांकडून ताबा पावतीच्या माध्यमातून ...
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत रोज शेकडो फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे. परंतु पालिका या फेरीवाल्यांकडून ताबा पावतीच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून कोट्यवधींचा निधी गोळा करीत आहे. प्रत्यक्षात पालिकेच्या तिजोरीत मात्र तुटपुंजाच निधी येत असल्याचा धक्कादायक आरोप स्वत: महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी केला. पालिकेच्या तिजोरीत ताबा पावतीचे अवघे २० टक्के उत्पन्न येत असून तब्बल ८० टक्के रकमेचा घोटाळा होत असल्याचा दावा त्यांनी पुराव्यानिशी केला आहे.
सोमवारी महासभेत महापौरांनी फेरीवाल्यांच्या माध्यमातून पालिकेला वार्षिक किती उत्पन्न मिळते, याचा ऊहापोह केला. त्यानुसार २०१९-२० मध्ये पालिकेला १ कोटी ४४ लाख ९१ हजार २७५ रुपये, तर महिन्याला १२ लाख ७ हजार ७०६ रुपये उत्पन्न मिळाले आहे. याचाच अर्थ एका फेरीवाल्याकडून ताबा पावतीच्या आधारे २० रुपये आकारले जातात. त्यानुसार दिवसाला शहरात केवळ २०१२ च फेरीवाले असून त्यांच्याकडून ही वसुली झाली, हे यातून स्पष्ट होते. २०२०-२१ मध्ये ५१ लाख ६४ हजार २३२ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. ७१३ फेरीवाल्यांकडून महिन्याला ४ लाख ३० हजार ३५२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. या कालावधीत कोरोनामुळे फेरीवाले कमी झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. मागील पाच महिन्यांत पालिकेला ४१ लाख ३० हजार ६५५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दिवसाला ४१ हजार ३०६ रुपयांचे उत्पन्न हे १३७६ फेरीवाल्यांकडून मिळाले, असे या माहितीतून स्पष्ट होत असल्याचे महापौरांनी सांगितले.