तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या बिनू वर्गीसचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 21:52 IST2021-08-25T21:44:04+5:302021-08-25T21:52:15+5:30
मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला बिनू वर्गीस याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज ठाणे न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे.

उपायुक्त केळकर यांच्याकडून घेतले पैसे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला बिनू वर्गीस याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज ठाणे न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे. त्यामुळे त्याला आता कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बिनू तसेच कथित महिला पत्रकार नाझीया सय्यद आणि उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरुद्ध विनयभांची तक्रार करणारी अन्य एक महिला यांनी संगनमताने ठाण्यातील बाळकूम येथील ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात १५ मे २०२१ ते १ जून २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा खंडणी उकळण्याचा प्रकार केला होता. उपायुक्त केळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ‘या रुग्णालयाच्या एका परिचारिकेचा लैंगिक छळ केळकर यांच्याकडून सुरु असल्याचा मजकूर एका व्हॉटसअॅप ग्रृपवर टाकण्यात आला. त्यानंतर बदनामी करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यातील तीन लाख रुपये हे १ जून २०२१ रोजी ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयात केळकर यांच्या कॅबिनमध्येच घेतल्याचा आरोप आहे. विनयभंगाची तक्रारही बनावट असून उलट बदनामी करण्याची भीती दाखवून आपल्याकडून तीन लाखांची खंडणी उकळल्याची तक्रार केळकर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ४ आॅगस्ट रोजी केली. त्यानंतर १२ आॅगस्ट रोजी कापूरबावडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अटक वॉरन्ट काढले. त्याआधीच त्याने १० आॅगस्ट रोजी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यावर २४ आॅगस्ट रोजी युक्तीवाद झाल्यानंतर २५ आॅगस्ट रोजी न्या. गोंधळेकर यांनी बिनूचा जामीन अर्ज फेटाळला. या गुन्हयातील काही पुरावे तसेच तीन लाखांची रोकडही बिनूकडे असल्यामुळे ती जप्त करायची आहे. असे अनेक मुद्दे पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर यांनी न्यायालयात मांडले. ते सर्व ग्राहय धरुन ठाणे न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली.