शुद्धीकरणासाठी बायोसॅनिटायझर
By admin | Published: April 6, 2016 01:58 AM2016-04-06T01:58:53+5:302016-04-06T01:58:53+5:30
पाण्याच्या भीषण टंचाईमुळे राज्यातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे खेडी आणि उपनगरेही होरपळून निघाली आहेत. नैसर्गिक जलस्रोत बायोसॅनिटायझर पद्धतीने शुद्ध करू
मुरलीधर भवार, कल्याण
पाण्याच्या भीषण टंचाईमुळे राज्यातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे खेडी आणि उपनगरेही होरपळून निघाली आहेत. नैसर्गिक जलस्रोत बायोसॅनिटायझर पद्धतीने शुद्ध करून त्यातील पाणी पिण्यायोग्य व पुन्हा वापरता येऊ शकते. त्यासाठी प्रोजेक्ट राबवण्याची तयारी जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी दर्शवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याकरिता पुढाकार घेतल्यास पाणीटंचाईवर मात करता येईल. तसेच प्रदूषित झालेले नैसर्गिक जलस्रोत वापरायोग्य करता येऊ शकतात, असा दावा पाटील यांनी केला आहे.
बायोसॅनिटायझरचा शोध पुण्यातील डॉ. उदय भवाळकर यांनी लावला आहे. त्यांच्या संस्थेसाठी पाटील काम करीत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांची पाटील यांनी नुकतीच भेट घेतली. प्रदूषित झालेले जलस्रोत बायो सॅनिटायझरद्वारे शुद्ध करता येऊ शकतात, असा दावा त्यांनी यावेळी केला.
कल्याण शहरातील काळातलाव एक किलोमीटर परिघाचा आहे. त्यात बराच मोठा जलसाठा आहे. तसेच उल्हास नदीतील जलपर्णीने जवळपास सात किलोमीटरचा परिसर व्यापला आहे. नाल्यांद्वारे मलमूत्रमिश्रित सांडपाणी थेट या नदीपात्रात सोडले जाते. हे प्रदूषण रोखण्यासाठी नदीत तसेच काळातलावात बायोसॅनिटायझरचा वापर केल्यास दोन्ही ठिकाणचे पाणी शुद्ध होईल.
त्याचबरोबर उल्हास नदीच्या वाहत्या पाण्यात बायोसॅनिटायझरचा वापर अधिक उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी किमान ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी पुढे सांगितले.