जैविक कचऱ्याची प्राणाशी गाठ

By admin | Published: December 22, 2015 12:32 AM2015-12-22T00:32:37+5:302015-12-22T00:32:37+5:30

कल्याण-डोंबिवलीसोबतच आसपासच्या शहरांतील जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मान्यतेअभावी रखडल्याने या शहरांचे आरोग्य धोक्यात आले आहे

The biological rubbish of biological waste | जैविक कचऱ्याची प्राणाशी गाठ

जैविक कचऱ्याची प्राणाशी गाठ

Next

मुरलीधर भवार,  कल्याण
कल्याण-डोंबिवलीसोबतच आसपासच्या शहरांतील जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मान्यतेअभावी रखडल्याने या शहरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या या कचऱ्यावर तळोजात प्रक्रिया होते, पण ती प्रक्रिया खर्चिक आहे. जैविक कचरा वाढत असूनही पालिकेचा प्रकल्प तयार असलेला प्रकल्प वापरात नसल्याने प्रक्रियेअभावी फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा नवा धोका या शहरांपुढे उभा ठाकला आहे.
कल्याण-डोंबिवलीसोबत बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड मधील रुग्णालये-लॅबमधील कचराही येथे येतो. या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने खाजगी कंत्राटदाराला ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर काम दिले आहे. कंपनीने प्रकल्प बांधून तयार केला आहे. तो सुरु करण्यास प्रदूषण मंडळाने तात्पुरती मंजुरी दिली आहे. पण कायमस्वरुपी मंजुरीसाठी महापालिकेने मंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तो कधी सुरु होईल याविषयी कोणतीही माहिती पालिकेकडे नाही. पाठपुरावा सुरु असल्याचे ठराविक छापाचे उत्तर सध्या दिले जाते.
महापालिकेने घनकचरा प्रकल्प राबविण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने शहरातील नव्या इमारतीच्या बांधकामाला एप्रिलमध्ये स्थगिती दिली. त्यावर सुनावणी सुरु आहे. या स्थगितीविरोधात पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतेली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही पालिकेने जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रकल्पही अद्याप सुरु केलेला नाही.
महापालिकेने ‘एन-व्हिजन’ या गुजरातच्या कंपनीला दहा वर्षासाठी ‘बांधा- वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचे कंत्राट दिले. उंबर्डे येथे दोन एकर जागाही दिली. तीन टन जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. प्रकल्प बांधून तयार आहे. कंत्राटदार महापालिकेला महिन्याला पाच लाख ३१ हजार रुपयांची रॉयल्टी देणार आहे. रुग्णालयातील प्रत्येक खाटेमागे कंत्राटदार डॉक्टरांकडून प्रत्येक किलो जैव कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ३३ रुपये आकारणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २४५ सरकारी व खाजगी रुग्णालये आहेत. १४० लॅब आहेत. ३३० अन्य दवाखाने आहेत. महापालिका जैव वैद्यकीय कचऱ्यावर यापूर्वी प्रक्रिया करीत होती. यापूर्वीचे कंत्राट संपल्याने नवा कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका फॅसिलिटेटरच्या भूमिकेत असल्याने बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर आणि मुरबाडमधील ३६१ रुग्णालये, लॅब आणि दवाखान्यांचा कचराही येथे येतो. त्यातून दररोज १८०० किलो कचरा गोळा होतो.

Web Title: The biological rubbish of biological waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.