छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:00 PM2023-06-20T12:00:26+5:302023-06-20T12:00:39+5:30
कामचुकारांना शिस्त लावण्यासाठी बसविणार फेसरिडिंग मशिन
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही बदल त्यांनी सुचविले आहेत. त्याची कामेही सुरू झालेली आहेत; परंतु काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या उपायुक्तांनी याच रुग्णालयाला अचानक भेट दिली असता, काही गंभीर बाबी त्यांच्या निर्दशनास आल्या आहेत. त्यामुळे आता येथील कर्मचाऱ्यांना, तसेच इतर स्टाफसह डॉक्टरांनाही शिस्त लावण्यासाठी याठिकाणी आता बायोमेट्रिक हजेरी मशीन लावली जाणार आहे. ज्यात फेसरीडींगचा समावेश असणार आहे.
महापालिकेत नव्याने आलेले उपायुक्त उमेश बिरारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच कळवा रुग्णालयात अचानक भेट दिली असता, काही विभागातील कर्मचारी हे कामाच्या वेळेसही कामावर हजर नसल्याचे दिसून आले. काही वॉर्डबॉय व इतर स्टाफही जागेवर नसल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम ऐन गर्दीच्या वेळेस ओपीडीवरदेखील झाल्याचे दिसले. त्यातही काही कर्मचारी सुटीवर होते. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
कामाच्या वेळेस गैरहजर असल्याने निर्णय
महापालिका मुख्यालयात ज्या पद्धतीने फेसरीडींग बायोमेट्रिक हजेरी मशीन बसविण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आता कळवा रुग्णलायतही ही मशीन बसविली जाणार आहे. कळवा रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आदींसह इतर ४०० च्या घरात स्टाफ आहे.