भातपिकांवरील अळी-खोडकिड्यांवर पक्षीथांब्यांचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:38+5:302021-08-28T04:44:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील भातपिकावर खोडकीडा, पाने गुंडाळणारी अळी या पीक रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील भातपिकावर खोडकीडा, पाने गुंडाळणारी अळी या पीक रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यावर मात करून हा रोग संपविण्यासाठी भाताच्या शेतात ठिकठिकाणी पक्षी गोळा करण्यासाठी पक्षी थांबे उभारले जात आहेत. या थांब्यांवर पक्षांना एकत्र आणून भातावरील अळी, खोडकीडकडे पक्षांचे लक्ष वेधून त्यांच्याकडून ती फस्त करण्याच्या उपाययोजना जिल्ह्याच्या दौऱ्यावरील कृषी विज्ञान पथकाच्या तज्ज्ञांनी हाती घेतल्या आहेत.
खोडकिड्यासह अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, आदी तालुक्यांत पालघरच्या डहाणू येथील कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. उत्तम सहाणे यांच्यासह कोकण विभगीय कृषी सहसंचालक अंकुश माने, उपसंचालक दीपक कुंटे, आदीं तज्ज्ञांच्या नियंत्रणातील पथक सध्या थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कीड रोगाची तीव्रता अभ्यासत आहे. या दौऱ्यामध्ये त्यांना पाणी साचणाऱ्या ठिकाणी व जेथे सतत पाणी वाहते आदी ठिकाणच्या शेतात पाने गुंडाळणारी अळी व सुरळीतील अळी व किडी रोग आढळून आला आहे.
भातावरील या रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सध्या या अळ्या, कीड पक्षांना खायला घालून आणि औषधी फवारणी करून नष्ट करण्याचा उपाय या पथकांकडून केला जात आहे. पाण्याच्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. त्यावर वेळीच मात करण्यासाठी एका एकरात जवळजवळ दहा पक्षी थांबे उभारण्याचे सुचविले जात आहे. चार ते पाच फूट उंच उभारलेल्या थांब्यांवर पक्ष्यांचा थवा बसविण्याचे नियोजन आहे. या बसलेल्या पक्षांकडून भातावरील कीड, अळी खाण्यात येते.