Bird Flu: २५ हजार पक्ष्यांना मारण्याचे काम सुरू; बर्ड फ्लूमुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:49 PM2022-02-18T12:49:11+5:302022-02-18T12:50:11+5:30

काही दिवसांतच दगावल्या ३०० हून अधिक कोंबड्या 

Bird Flu: 25,000 birds killed; The decision was made because of bird flu in thane district | Bird Flu: २५ हजार पक्ष्यांना मारण्याचे काम सुरू; बर्ड फ्लूमुळे घेतला निर्णय

Bird Flu: २५ हजार पक्ष्यांना मारण्याचे काम सुरू; बर्ड फ्लूमुळे घेतला निर्णय

Next

भातसानगर : देशी कोंबड्या व बदके बर्ड फ्लूने मृत पावल्याची घटना तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममध्ये घडल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत ३०० हून अधिक कोंबड्या दगावल्याने येथे खळबळ माजली असून पशुसंवर्धन विभागाने एक किलोमीटर परिघातील किमान २५ हजारांहून अधिक पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने गुरुवारी केले आहे.

शहापूर तालुक्यातील वेहळोली (वासिंद) येथील मुक्तजीवन सोसायटीच्या शेडमधील देशी कोंबड्या व बदके अचानक मृत पावत होते. याबाबत मुक्तजीवन सोसायटीने वासिंद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कळविले. त्यानुसार, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार केले. मात्र, उपचारांनंतरही कोंबड्या दगावत असल्याने मृत कोंबड्यांच्या शवविच्छेदनाचे व जिवंत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी ११ फेब्रुवारीला पाठविले. त्याबाबतच्या अहवालात बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुरुवारी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अजित हिरवे व डॉ. जी.जी. चांदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सहायक आयुक्त डॉ. अमोल सरोदे, शहापूर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन दळवी यांच्यासह ७० जणांच्या पथकाने वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीत धाव घेतली. मुक्तजीवन सोसायटीच्या शेडमधील सर्वच कोंबड्या दगावल्या असून लगतच्या शेडमधील किमान १०० कोंबड्या व काही बदके सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

एक किमी परिघात कोंबड्या विकण्यास मनाई
दरम्यान, बाधित क्षेत्रापासून एक किमीच्या परिघात असलेल्या पोल्ट्री फार्ममधील पक्षी तसेच पक्षी खाद्य व अंडी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली असून बाधितक्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकनविक्रेते, वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याबाबतही ठाणे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.
 

Web Title: Bird Flu: 25,000 birds killed; The decision was made because of bird flu in thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.