bird flu :भिवंडीकरांची चिंता वाढली ; ६ पक्षांचा बर्ड फ्लूने मृत्यू ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 05:35 PM2021-01-14T17:35:38+5:302021-01-14T17:36:27+5:30
Bhiwandi bird flu News : कोरोना संकटावरील लस तयार झाली असल्याने कोरोना संकटाच्या चिंतेतून दिलासा मिळालेल्या नागरिकांना राज्यात आलेल्या बर्ड फ्लू च्या साथीने पुन्हा चिंतेत टाकले आहे .
- नितिन पंडीत
भिवंडी - कोरोना संकटावरील लस तयार झाली असल्याने कोरोना संकटाच्या चिंतेतून दिलासा मिळालेल्या नागरिकांना राज्यात आलेल्या बर्ड फ्लू च्या साथीने पुन्हा चिंतेत टाकले आहे . या बर्ड फ्लूमुळे आता भिवंडीकरांच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे . तालुक्यातील पिंपळास पक्षु वैद्यकीय दवाखान्याच्या हद्दीतील सोनाळे ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या घोळपाडा व खैरपाडा या दोन ठिकाणी ५ कावळे आणि एक कबुतर बर्ड फ्लू या रोगाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे . घटनास्थळी भिवंडी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ देवश्री जोशी व त्यांचे पथक पोहचले असून पक्षांचा मृत्यू नेमकी कोणत्या कारणाने झाला यासंदर्भातील अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे . दरम्यान या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाला असल्याचा प्रार्थमिक अंदाज देखील संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे . तर दुसरीकडे भिवंडीसारख्या शहरात कावळ्यांच्या मृत्यूने शरवासीयांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे . दरम्यान भिवंडी पंचायत समितीच्या पशु वैद्यकीय दवाखान्याच्या हद्दीतील घोळपाडा येथे तीन कावळे व खैरपाडा येथे दोन कावळे आणि एक कबुतर असे एकूण सहा पक्षांचा मृत्यू झाले असल्याची माहिती भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ प्रदीप घोडपडे यांनी दिली असून या रोगावर नियंत्रण मिळवण्या साठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ घोडपडे यांनी सांगितले.
तर या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू ने झाला असल्याचा प्रार्थमिक अंदाज वर्तविला जात असून संसर्ग पसरू नये यासाठी या मृत पक्षांना जमिनीत पुरण्यात आले असून या पक्षांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुणे येथील लॅब मध्ये स्याम्पल पाठविण्यात आले आहेत अशी प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ देवश्री जोशी यांनी दिली आहे.