पालघरमध्येही बर्ड फ्लू? वसईच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत, नमुने पाठविले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 08:28 AM2022-02-19T08:28:07+5:302022-02-19T08:28:56+5:30
मागील पाच ते सहा दिवसापासून वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये मागील पाच-सहा दिवसांपासून दररोज २० ते ३० पक्षी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडत असल्याची बाब समोर आली होती.
पालघर : जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्यानंतर आता वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममधील २० ते ३० कोंबड्या मागील ५-६ दिवसांपासून मृत्युमुखी पडत असल्याचे समोर आले आहे. या पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या तपासणीसाठी पुणे आणि नंतर तेथून भोपाळ येथील सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वाशिंद जवळील पाषाणे गावातील एका पोल्ट्री फार्ममधील शेकडो कोंबड्या अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्याची बाब उघड झाल्यानंतर, या मृत कोंबड्या तपासणीसाठी भोपाळ येथील सुरक्षा पशुधन संस्थेकडे पाठविण्यात आल्या होत्या. या कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या पोल्ट्री फार्ममधील एक हजार कोंबड्या नष्ट करीत परिसरातील एक किलोमीटर क्षेत्रातील सर्वच कुक्कुटवर्गीय पक्षी नष्ट करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभाग आणि संबंधित प्रशासन विभागाला दिले होते. त्यामुळे पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यानंतर ही बर्ड फ्लूची लाट पालघरमध्ये शिरकाव करते की काय? अशी भीती पोल्ट्री फार्मधारक आणि चिकन विक्रेते दुकानांमध्ये आहे. दरम्यान, मागील पाच ते सहा दिवसापासून वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये मागील पाच-सहा दिवसांपासून दररोज २० ते ३० पक्षी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडत असल्याची बाब समोर आली होती.
यानंतर त्या मृत कोंबड्यांचे नमुने प्राणी रोग तपासणी विभाग पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर ते आता अधिक तपासासाठी सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळकडे पाठविण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात याचा अहवाल येण्याचे अपेक्षित असल्याची माहिती पशुधन अधिकारी डॉ. कांबळे यांनी लोकमतला दिली.
कृती आराखडाही तयार - डॉ. कांबळे
भोपाळ येथून या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास शासनाच्या मानक कार्य पद्धतीनुसार पुढील कार्यवाहीसाठी आम्ही तयार आहोत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे आरआरपी (रॅपिड रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात आली असून, आमचा कृती आराखडाही पुढील कारवाईसाठी तयार करण्यात आल्याचे पशुधन संशोधन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले. भोपाळहून नेमका काय अहवाल येतो याकडे अधिकारी, व्यावसायिक यांचे लक्ष लागले आहे. जर बर्ड फ्लू निष्पन्न झाल्यास परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.