ठाण्यात बर्ड फ्लूची एंट्री! १०० कोंबड्यांचा मृत्यू; २५ हजार कोंबड्यांची कत्तल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:58 AM2022-02-18T10:58:19+5:302022-02-18T10:58:38+5:30
ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; शहापुरातील कुक्कुट पालन केंद्रातील १०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू
ठाणे- ठाण्याच्या शहापूरमधील एका कुक्कुट पालन केंद्रातील १०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. शहापूरातील वेह्लोली गावात १०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. भाऊसाहेब डांगळे यांनी दुजोरा दिला. मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यामधून कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.
वेह्लोली गावातील १०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून कुक्कुटपालन केंद्राच्या १ किलोमीटर परिघातील कोंबड्यांची कत्तल करण्यात येणार आहे. या कोंबड्यांची संख्या जवळपास २५ हजारांच्या घरात आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन खात्यानं कोंबड्या मारण्याच्या सूचना दिल्याचं नार्वेकरांनी सांगितलं.
Maharashtra | Around 100 chickens suddenly died at a poultry farm in Vehloli village of Shahapur tehsil in Thane district, in view of a bird flu threat; their samples have been sent to a lab in Pune: Thane DM & Collector Rajesh J. Narvekar
— ANI (@ANI) February 18, 2022
बर्ड फ्लू पसरू नये यासाठी स्थानिक प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचं ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब डांगळेंनी सांगितलं. केंद्रीय मत्स्य पालन आणि पशुपालन मंत्रालयाला याबद्दलची माहिती देण्यात आल्याचं ते पुढे म्हणाले.