कल्याण पश्चिमेत झाडांच्या फांद्या छाटल्याने पक्ष्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:56+5:302021-07-14T04:44:56+5:30
कल्याण : कल्याण पश्चिम भागातील अनुपमनगर येथील झाडांच्या फांद्या छाटल्याने जवळपास २० पक्ष्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला आहे. याकडे वाइल्ड ...
कल्याण : कल्याण पश्चिम भागातील अनुपमनगर येथील झाडांच्या फांद्या छाटल्याने जवळपास २० पक्ष्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला आहे. याकडे वाइल्ड लाइफ ॲॅनिमल ॲॅण्ड रेपटाइल्स रेस्क्यू या संस्थेने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत ११ पिल्लांवर उपचार करून त्यांना चारा देण्याचे काम केले आहे. ही पिल्ले बरी झाल्यानंतर त्यांना वनखात्याच्या माध्यमातून वनात सोडण्यात येणार आहे.
संस्थेच्या कार्यकर्त्या फाल्गुनी दलाल य़ांनी सांगितले की, अनुपमनगरात फांद्या छाटल्याने पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे जवळपास २० पक्ष्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला आहे. त्यात विविध जातीच्या पक्ष्यांचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी पक्षी घरटी बांधतात. मात्र भरपावसात घरटी उद्ध्वस्त झाल्याने पक्ष्यांचा निवारा हरवला आहे. संस्थेच्या पुढाकाराने ११ पिल्लांना सोडविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार करून चारा देण्याचे काम सुरू आहे. गांधारी, अनुपमनगर परिसर हा उल्हास नदी आणि खाडी किनाऱ्यास लागून आहे. त्यामुळे या ठिकाणच्या झाडांवर पक्ष्यांचा चांगला वावर असतो. त्यामुळे फांद्या पावसाळ्य़ापूर्वीच छाटल्या जाव्यात, जेणेकरून पक्षी व त्यांची पिल्ले पावसाळ्य़ात बेघर होणार नाहीत.
----------------------
फोटो-कल्याण-फांद्या छाटल्या
------------------------