मीरारोडच्या चित्रकार प्रिया पाटील यांना बिर्ला फाऊंडेशनचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 07:11 PM2019-02-25T19:11:18+5:302019-02-25T19:11:24+5:30
संसाराच्या रहाटगाड्यातुन आपल्यातील चित्रकलेला पुन्हा जागवणारया मीरारोडच्या प्रिया प्रमोद पाटील यांना दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२५ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात राजश्री बिर्ला फाउंडेशन पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मीरारोड - संसाराच्या रहाटगाड्यातुन आपल्यातील चित्रकलेला पुन्हा जागवणारया मीरारोडच्या प्रिया प्रमोद पाटील यांना दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२५ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात राजश्री बिर्ला फाउंडेशन पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या पिचवाई शैलीतील कामधेनू या चित्रास राष्ट्रीय स्तरावरील भारतिय चित्रशैली प्रकारात हा सन्मान मिळाला आहे.
प्रिया पाटील ह्यांनी साकारलेल्या अनेक चित्रशैलींना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पाटील ह्या त्यांच्या सारख्याच संसारात गुरफटुन आपली उपजत कला हरवुन बसलेल्या महिलांसाठी चित्रांगना नावाने चित्रकलेचे प्रदर्शन गेल्या काही वर्षां पासुन आयोजित करत आहेत.
मुंबईच्या जहांगीर कला दालनात पार पडलेल्या एका कार्यक्रमात ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी व्यंगचित्रकार तथा मनसे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ चित्रकार अनिल नाईक, चित्रकार सुहास बहुलकर, शिल्पकार इंद्रजित यादव आदींसह देशासतील नामवंत चित्रकार उपस्थित होते.
पिचवाई हा भारतीय चित्रशैलीचा प्रकार असून आज राजस्थानच्या लोककलेचा हा एक भाग आहे. परंतु याचं मूळ हे महाराष्ट्रातील औरंगाबादजवळ वेरूळ येथे आढळून आले. अठराव्या शतकात महाराष्ट्रातील पिचवाई शैलीतील चित्रकार हे राजस्थानात स्थलांतरित झाले होते. पिचवाई या शब्दाचा अर्थ पाठीमागे अडकवले जाणारे असा होतो. या शैलीतील चित्र हे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या मागे आरास म्हणून लावले जाते असे पाटील यांनी सांगीतले.