मंदार हळबे यांनी स्वीकारला पदभार
By admin | Published: June 28, 2017 03:11 AM2017-06-28T03:11:40+5:302017-06-28T03:11:40+5:30
केडीएमसीत भाजपा पाठोपाठ मनसेनेही आपल्या पदांमध्ये बदल केले आहेत. गटनेते मंदार हळबे यांच्याकडे पुन्हा विरोधी पक्षनेतेपदाची
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीत भाजपा पाठोपाठ मनसेनेही आपल्या पदांमध्ये बदल केले आहेत. गटनेते मंदार हळबे यांच्याकडे पुन्हा विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांच्याकडे गटनेतेपद देण्यात आले आहे. हळबे यांची दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे. या पदाचा पदभार त्यांनी मंगळवारी पक्षाचे प्रमुख मान्यवर व पदाधिकारी यांच्याप्रमुख उपस्थितीत स्वीकारला. या वेळी हळबे यांच्या मातोश्री गीता व पत्नी सोनाली या वेळी आवर्जून उपस्थित होत्या.
हळबे हे एक अभ्यासू नगरसेवक आहेत. याआधी मागील टर्ममध्ये त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. परंतु, तत्कालीन महापौरांच्या काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद बहाल करण्याच्या कृतीमुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागले होते. महापौरांच्या निर्णयाविरोधात त्यांनी कायदेशीर लढाही दिला होता. आता पुन्हा हळबे यांच्या गळ््यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली आहे.
केडीएमसीच्या मागील महासभेत विरोधी पक्षनेते म्हणून हळबे यांच्या नावाची महापौर राजेंद्र देवळेकर यांनी घोषणा केली होती. मंगळवारी पदभार स्वीकारल्यानंतर महापौर, सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, मनसेचे स्थानिक नेते काका मांडले, माजी आमदार प्रकाश भोईर, संदेश प्रभुदेसाई आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशासन आणि सत्ताधारी जेथे चूक करतील, तेथे त्यांना कडाडून विरोध करणार आणि त्यांचे निर्णय नागरिकांच्या हिताचे असतील तर पक्षभेद विसरून त्यांना सहकार्य करणार, अशी प्रतिक्रिया हळबे यांनी ‘लोकमत’ला दिला.