नरेंद्र मेहतांसोबत वाढदिवस; पोलीस अधिकाऱ्याची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 09:02 AM2022-09-23T09:02:20+5:302022-09-23T09:02:59+5:30
देसाई यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यातील त्यांच्या दालनात साजरा करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : विविध गुन्ह्यांत आरोपी असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या हस्ते पोलीस ठाण्यातच वाढदिवसाचा केक कापून खाणे आणि वाढदिवस साजरा करणे भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांना भोवण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीसह अन्य काही नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले.
देसाई यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यातील त्यांच्या दालनात साजरा करण्यात आला. मेहता त्यांच्या समर्थकांसह देसाई यांच्या दालनात पोहोचले. तेथे केक कापण्यात आला व मेहतांनी देसाई यांना केक भरवला, बुके दिला. त्याची छायाचित्रे मेहता समर्थकांनी समाज माध्यमांवर शेअर केली. आम आदमी पार्टीसह मेहतांच्या विरोधातील फिर्यादी जय शुक्ला यांनी पोलीस आयुक्त व शासनाकडे तक्रार केली. आम आदमी पार्टीचे ब्रिजेश शर्मा, सुखदेव बिनबंसी, राजेश शर्मा आदींनी तक्रार केली. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त अमित काळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.