बीएसयूपीच्या घरांवरून जोरदार हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:46 AM2018-07-17T02:46:39+5:302018-07-17T02:46:54+5:30
बीएसयूपी योजनेतील घरांच्या वाटपावरून कल्याणमधील इंदिरानगर आणि साठेनगर येथील रहिवाशांमध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार हाणामारी झाली.
कल्याण : बीएसयूपी योजनेतील घरांच्या वाटपावरून कल्याणमधील इंदिरानगर आणि साठेनगर येथील रहिवाशांमध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार हाणामारी झाली. महापालिका सुरक्षारक्षकांना लाभार्थी जुमानत नसल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यामुळे हाणामारी करणारे पांगले. मात्र, या सगळ्या प्रकरणात महापालिकेने कोणतीही भूमिका न घेतल्याने लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
आधारवाडी डम्पिंगशेजारच्या साठेनगरातील रहिवाशांना केडीएमसीने बीएसयूपी योजनेत उंबर्डे येथे घरे दिली होती. मात्र, तेथे वीज, पाणी आणि अन्य सोयीसुविधा नसल्याने लाभार्थ्यांनी ओरड सुरू केली. तसेच प्रकल्पाचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे महापालिकेने १५ लाभार्थ्यांना इंदिरानगरातील बीएसयूपी योजनेतील घरांच्या चाव्या दिल्या.
परंतु, इंदिरानगरातील १४७ जणांना महापालिकेने अपात्र ठरवले आहे. या अपात्र नागरिकांच्या घरांच्या जागेवर महापालिकेने बीएसयूपीची इमारत बांधली. त्यामुळे महापालिकेने त्यांची संक्रमण शिबिरात राहण्याची व्यवस्था केली. तसेच त्यांना घरभाडेही दिले. आता महापालिका त्यांच्याकडे वास्तव्यासंबंधातील पुरावे मागत आहे. त्यामुळे त्यांना बीएसयूपीची घरे मिळालेली नाहीत. मात्र, साठेनगरच्या लाभार्थ्यांना चाव्या दिल्याने इंदिरानगरातील अपात्र लाभार्थ्यांनी त्यास जोरदार हरकत घेतली. सोमवारी सकाळी साठेनगरचे लाभार्थी सामान घेऊन इंदिरानगरात पोहोचले असता त्यांना इंदिरानगरातील अपात्र लाभार्थ्यांनी विरोध करत पिटाळले. त्यामुळे साठेनगरातील लाभार्थी बिºहाड घेऊन महापालिका मुख्यालयात आले. त्यावेळी तेथे इंदिरानगरातील अपात्र लाभार्थीही पोहोचले. साठेनगरातील लाभार्थ्यांना त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद केले. मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर हा राडा अर्धा तास सुरू होता. सुरक्षारक्षकांनी ही हाणामारी थांबवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, लाभार्थी त्यांना जुमानत नव्हते. अखेरीस बाजारपेठ पोलिसांना पाचारण केल्यानंतर जमाव पांगला.
दरम्यान, हाणामारी होण्यापूर्वी काहींनी आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली होती. त्यावेळी बोडके यांनी साठेनगरासाठी ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. त्यांना राहण्यास हरकत घेऊ नका, असे इंदिरानगरच्या अपात्र लाभार्थ्यांना सांगितले होते. तसेच अपात्रतेच्या मुद्यावर बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर, हा प्रकार घडला असल्याची माहिती साठेनगरातील लाभार्थी राजू ढगे यांनी दिली.
>महापालिका, पोलिसांकडून न्याय नाही : साठेनगरातील रहिवासी दशरथ साबळे म्हणाले, या सगळ्या प्रकरणात महापालिकेची भूमिका चुकीची आहे. लाभार्थ्यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे. १५ दिवसांपूर्वी आम्हाला चावी मिळाली असताना आम्हाला घरात राहू दिले जात नाही. उंबर्डे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर आम्ही तिथे जाणार आहोत. ही तात्पुरती व्यवस्था असूनही त्यांनी जोरदार हरकत घेतली. रस्ता अडवला. जिन्यात पत्रे ठेवले. घरात जाऊ दिले नाही. साठेनगरातील महिला लाभार्थी अवंती खंडागळे, ताराबाई साबळे, विमल नवगिरे, द्वारकाबाई घुले यांना मारहाण केली आहे. पावसात भिजलेला त्यांचा संसार व बिºहाडाची नासधूस केली आहे. पोलीस व महापालिकेकडून आम्हाला न्याय मिळालेला नाही.