भिवंडी मनपा कामगारांनी केले पगारासाठी कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2015 12:18 AM2015-07-08T00:18:54+5:302015-07-08T00:18:54+5:30
महानगरपालिकेतील अधिकारीवर्ग नियमीत पगार घेत असून लिपिक, शिपाई व खातेप्रमुखांना गेल्या अडीच महिन्यापासून तो न मिळाल्याने तसेच
भिवंडी : महानगरपालिकेतील अधिकारीवर्ग नियमीत पगार घेत असून लिपिक, शिपाई व खातेप्रमुखांना गेल्या अडीच महिन्यापासून तो न मिळाल्याने तसेच निवृत्त कामगारांना निवृत्तीवेतन न मिळाल्याने संतप्त कामगारांनी मंगळवारी काम बंद आंदोलन केले.
महानगरपालिकेत काम करणाऱ्या सर्व कामगारांना एकाच वेळी मासिक पगार देण्याऐवजी अधिकाऱ्यांचा पगार केला जातो. ठेकेदारांची बिले नियमीत दिली जातात आणि कर्मचाऱ्यांना अडीच महिन्यापासून पगारापासून वंचित ठेवले जाते. या दुजाभावाने संतप्त होऊन सोमवारी दुपारनंतर काही कामगारांनी उपायुक्ता विजया कंठे यांना घेराव घालून पगाराची मागणी केली. मात्र त्यांनी कोणतेही आश्वासन न दिल्याने कर्मचारी संघर्ष कृती समितीने मंगळवारी सकाळपासून ‘काम बंद’ आंदोलन केले. या कृती समितीत लेबर फ्रंट, म्युनिसीपल मजदूर युनियन, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, वाहन चालक संघटना यांचा समावेश होता. कामकाज बंद झाल्याने महापौर तुषार चौधरी यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पाच दिवसांत पगार व निवृत्त वेतनाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले. तसेच याबाबत महापौर दालनात बुधवारी बैठकीचे आयोजन केले आहे. महापौरांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.