भाजपाला सत्ता जाण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 02:34 AM2018-06-29T02:34:15+5:302018-06-29T02:34:17+5:30
महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारण वेगवेगळे वळण घेत आहे. ओमी टीमला महापौर पद दिल्यास साई पक्ष सत्तेतून बाहेर पडून शिवसेनेची सत्ता येईल
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारण वेगवेगळे वळण घेत आहे. ओमी टीमला महापौर पद दिल्यास साई पक्ष सत्तेतून बाहेर पडून शिवसेनेची सत्ता येईल, असी भीती भाजपा नेत्यांना सतावू लागली आहे. भाजपाने ओमी टीमला आतापर्यंत सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले आहे. जर उद्या मुख्यमंत्र्यांनी ओमी टीमला महापौरपद देण्याचे सांगितल्यास राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. त्यातच शिवसेनाही सत्तेसाठी उत्सुक असल्याने ओमी टीमसोबत युतीचे संकेत दिल्याने पालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे.
उल्हासनगर महापालिकेवर भाजपाने ओमी टीमच्या मदतीने झेंडा फडकावत महापौरपद पदरात पाडून घेतले. मात्र ओमी टीमला सव्वा वर्ष सत्तेपासून लांब ठेवल्याने, त्यांच्यात नाराजी पसरली. महापौर पदाची पहिली सव्वावर्ष भाजपाने तर नंतरची सव्वावर्ष ओमी टीमने वाटून घेतली. मीना आयलानी यांच्या महापौरपदाला कार्यकाळ पाच जुलैला संपत असल्याने ओमी टीमने महापौरपदाची जय्यत तयारी सुरू केली आहे.
महापौर आयलानी यांनी अद्याप राजीनामा दिलेला नसल्याने ओमी टीमच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. पक्षाचा आदेश आल्यास महापौरपदाचा राजीनामा देईन असे सांगून आयलानी यांनी ओमी टीमची पुन्हा एकदा कोंडी करून ठेवली आहे. दुसरीकडे ओमी टीमला महापौरपद दिल्यास साई पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, अशी भीती भाजपाच्या वरिष्ठ व स्थानिक नेत्यांना वाटू लागली आहे. ही परिस्थिती पाहता ओमी टीमचे महापौरपदाचे स्वप्न भंगणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आश्वासनानुसार ओमी टीमला महापौरपदाच्या पहिल्या टर्ममधील सव्वावर्षाचे महापौर पद दिले जाणार होते. प्रत्यक्षात टीमच्या महापौर पदाला सुरूंग लागला. मात्र मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील असा विश्वास ओमी यांनी व्यक्त केला आहे.
साई पक्षाचे प्रमुख व उपमहापौर जीवन इदनानी यांनी महापौर मीना आयलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यावर सत्तेत राहयचे की नाही याचा निर्णय घेवू, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्यातरी भाजपा महाआघाडीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ओमी टीमला महापौरपद मिळू नये यासाठी स्थानिक भाजपा नेते व साई पक्ष सक्रीय झाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय निरीक्षकांमध्ये सुरू आहे.