भाजपाचे पुन्हा मोदी कार्ड
By Admin | Published: June 17, 2017 01:44 AM2017-06-17T01:44:22+5:302017-06-17T01:44:22+5:30
मीरा-भार्इंदर पालिकेच्या निवडणुकीतही भाजपाने पुन्हा मोदी कार्ड वापरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी केंद्रातील मोदीप्रणित सरकारने गेल्या तीन वर्षांत
- लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेच्या निवडणुकीतही भाजपाने पुन्हा मोदी कार्ड वापरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी केंद्रातील मोदीप्रणित सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या भरगच्च कामगिरीचा दाखला देणारी पत्रके घरोघरी वाटण्यास सुरूवात केली आहे. राज्यात मध्यावधी निवडणुकांचे वादळ घोंगावत असताना मतदार खरोखरी पूर्वीइतका पक्षासोबत आहे का, याची चाचपणी यानिमित्ताने करण्यात येणार आहे.
मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीचे वातावरण तापण्यापूर्वीच भाजपाने प्रचाराला सुरूवात केली आहे. मोदी सरकारच्या कामगिरीसोबतच मीरा-भार्इंदर पालिकेत आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीचा लेखाजोखाही या पत्रकात मांडण्यात आला आहे.
मीरा-भार्इंदर पालिकेची निवडणूक दोन महिन्यांत होणार आहे. यात भाजपाला स्वबळावर सत्ता मिळावी, भाजपा हा प्रथम क्रमांकाचा पक्ष असावा असा चंग मेहता यांनी बांधला आहे. त्यासाठी कोणतीही कसर न ठेवता मतदारांपर्यंत जाण्याचे सर्व फंडे वापरण्याची तयारी त्यांनी केली आहे.
भाजपात इच्छुकांची संख्या उदंड आहे. शिवाय इतर पक्षातून पक्षात घेतलेल्यांनाही उमेदवारी हवी आहे. त्यामुळे जोवर उमेदवारी निश्चित होत नाही तोवर कोणीही प्रचार करू नये, अशी समज इच्छुकांना देण्यात आली आहे. त्यातून नाराज, बंडखोरांना रोखण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. परंतु, अंतर्गत गटबाजीमुळे भाजपातील इतर गटातील इच्छुकांनी प्रचार सुरुही केला. हे मतभेद इतक्या उघडपणे बाहेर पडू लागले, तर भाजपाची ऐन निवडणुकीत चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
त्यातच चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने पक्षाला सवार्धिक मतदान होते, असा अनुभव गेल्या सहा महहिन्यांतील विविध पालिका निवडणुकांनी दिला आहे. त्यामुळे आतापासूनच पक्ष, पक्षाचे चिन्ह मतदारांवर ठसवण्यासाठी आणि अच्छे दिन कसे आणले गेले त्याची पत्रके भाजपाने वाटण्यास सुरूवात केली आहे. पक्षांतर्गत कुरघोडीला फारशी किंमत न देता मेहता यांनी तूर्त बाजूला सारुन पक्षाला मतदारांपर्यंत पोचविण्याची धडपड सुरू केली आहे. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत अनेक प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मिळवले आणि त्या आधारे भरपूर प्रश्न मार्गी लावल्याचे सांगत पत्रके वाटत जोरदार प्रचार सुरु केला. सध्या ही पत्रके घरोघर वाटत आहेत.
विस्तारक
होण्यास अनिच्छा
पक्ष वाढवण्यासाठी, मतदार-कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजना राबवली जाणार आहे. त्यासाठीचे विस्तारक म्हणून काम करावे लागणार आहे. त्याचे प्रशिक्षण नुकतेच झाले.
त्यात प्रत्येकाने आपल्या प्रभागाखेरीज दुसऱ्याच्या प्रभागात जाऊन पक्षाचा प्रचार करण्याचे फर्मान सोडण्यात आले. त्याला अनेकांनी नापसंती दर्शविली आहे. मूळात ज्यांनी प्रभागावर दावा केला आहे, त्यांना इतरांची लुडबूड नको आहे.
शिवाय जे फक्त उमेदवारीसाठी पक्षात आले आहेत, त्यांना ही पक्षप्रचाराची धुरा खांद्यावर घेण्याची इच्छा नाही. शिवाय सध्या स्वत:च्याच प्रभागात प्रचारासाठी कमी पडत असलेले दुसऱ्याच्या प्रभागात जाऊन काय प्रचार करणार, अशीही चर्चा रंगली आहे.
‘अच्छे दिना’ची खिल्ली
भाजपातर्फे वाटल्या जाणाऱ्या पत्रकांत केंद्रात, राज्यात, पालिकेत केलेल्या चांगल्या कामांचा उल्लेख आहे. त्यातून अच्छे दिन आल्याचे मतदारांवर ठसवले जात आहे. केंद्र आणि राज्यातील काँग्रेसप्रणित सरकारे कासवगतीने काम करत होती, तर भाजपा सरकार गतीमान असल्याचा दावा पत्रकात करण्यात आला आहे. ती पत्रके सोशल मीडियावर लगेचच गाजू लागली आहेत. अच्छे दिनाच्या मुद्दयावर त्याची यथेच्छ खिल्ली उडवली जात आहे.
केंद्र आणि राज्यातील आधीच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या योजनांचे श्रेय घेणे- नाव बदलून त्याच योजना पुन्हा आणणे, शिवसेनेसोबत सत्तेत असूनही सर्व कामे आम्हीच केल्याचे ढोल पिटण्याच्या वृत्तीचाही नेटकऱ्यांनी यथेच्छ समाचार घेण्यास सुरूवात केल्याने सोशल मीडियावर मात्र भाजपाची पत्रके आणि मीरा-भार्इंदरची निवडणूक गाजू लागली आहे.
सेनेला अनुल्लखाने मारले : केंद्र, राज्यासोबत पालिकेतील कामांचे श्रेय घेताना शिवसेनेला अनुल्लेखाने मारण्यात आले आहे. पालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षातच प्रमुख लढाई रंगणार असल्याने भाजपाने शिवसेनेचा उल्लेख सफाईदारपणे टाळला आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सोशल मीडियातही परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.