गटनेत्यास घेराव घालणाऱ्या नगरसेवकांच्या अटकेसाठी भाजप आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:41 AM2021-03-17T04:41:38+5:302021-03-17T04:41:38+5:30
ठाणे : कोरोना आपत्तीच्या काळात १०० ते १५० जणांच्या झुंडीने येऊन घेराव घालणाऱ्या शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह ४० जणांवर ...
ठाणे : कोरोना आपत्तीच्या काळात १०० ते १५० जणांच्या झुंडीने येऊन घेराव घालणाऱ्या शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह ४० जणांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, महापालिकेने अद्यापही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नसल्याने मंगळवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन त्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून चार दिवसांत कार्यवाही केली नाही, तर दालनाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
ठाणे शहरात अनावश्यक असलेले तीन पादचारी पूल उभारून १३ कोटी रुपयांची लूट केली जात असल्याच्या प्रकारावर भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी आक्षेप घेऊन या खर्चातून शिवसेना निवडणूक निधी जमा करीत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी आणि १०० ते १५० पदाधिकाऱ्यांनी डुंबरे यांना त्यांच्या केबिनमध्येच घेराव घातला होता. त्यामुळे या नगरसेवकांवर कारवाईसाठी भाजपने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात त्यानुसार गुन्हादेखील दाखल झाला आहे. परंतु, महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात अद्यापही कोणतीच भूमिका न घेतल्याने भाजपने मंगळवारी त्यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकारची माहिती त्यांना दिली. तसेच कोरोना आपत्तीच्या काळात जे काही घडलेले आहे, त्यानुसार संबंधित शिवसेनेच्या नगरसेवकांवर कारवाईची मागणी केली. यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक नारायण पवार, अर्चना मणेरा, नम्रता कोळी, मिलिंद पाटणकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.