भिवंडीत कचरा समस्येबाबत भाजपा आक्रमक; मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर टाकला कचरा
By नितीन पंडित | Published: March 7, 2024 07:04 PM2024-03-07T19:04:30+5:302024-03-07T19:05:55+5:30
आंदोलनात माजी सभागृहनेते सुमित पाटील, श्याम अग्रवाल यांसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भिवंडी: महानगरपालिका हद्दीतील कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द केल्यानंतर मागील एक आठवड्यापासून शहरात कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी जमा झाले आहेत. या विरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून गुरुवारी सायंकाळी भाजपा शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील, आमदार महेश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली मनपा मुख्यालतावर उग्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी सभागृहनेते सुमित पाटील, श्याम अग्रवाल यांसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पालिका मुख्यालया समोर शहरातील ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटली असून शहर बकाल झाले आहे. त्याविरोधात आपला संताप व्यक्त करीत पालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली.या वेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी कचरा समस्येला वाचा फोडण्यासाठी पालिका मुख्यालयात निदर्शने करण्यासाठी आले होते.त्यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी अचानक आपल्या सोबत आणलेला कचऱ्याचा डंपर मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर टाकला.यामुळे परिसरात एकच दुर्गंधी सुटली होती.