स्मशानभूमीच्या श्रेयात भाजपाचीही उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 04:17 AM2018-04-14T04:17:12+5:302018-04-14T04:17:12+5:30
घोडबंदरच्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून शुक्रवारी पुन्हा महासभेत गदारोळ झाला. ती न होण्यासाठी संजय केळकर यांनी आधी प्रयत्न केले असल्याचा मुद्दा भाजपाने मांडला.
ठाणे : घोडबंदरच्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून शुक्रवारी पुन्हा महासभेत गदारोळ झाला. ती न होण्यासाठी संजय केळकर यांनी आधी प्रयत्न केले असल्याचा मुद्दा भाजपाने मांडला. तोच मुद्दा शिवसेना सभागृह नेत्यांनी लावून धरल्याचा आरोपही केला. एकाच पक्षातील दोन नेते स्मशानभूमी हवी आणि नको या भांडणात अडकल्याचे सांगून भाजपाने शिवसेनेचे श्रेय खेचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. यामुळे हा संघर्ष शिवसेनेतील दोन नेत्यांपासून भाजपाच्या आमदारापर्यंत येऊन पोहचला आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे या स्मशानभूमीच्या बाजूने आहेत, तर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी तिला विरोध केला आहे. म्हसे यांनी विरोध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. तर प्रशासनाच्या वतीने प्रमोद निंबाळकर यांनी उत्तर दिल्यानंतरही तेथे स्मशानभूमी होऊ शकते अथवा नाही, याबाबतचा कोणताही खुलासा केला नाही.
सभागृहातील तापलेले वातावरण लक्षात घेता, स्मशानभूमी होणार की नाही, याचा निर्णय १९ एप्रिलला पालकमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त आणि रहिवासी घेतील, असे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले.
>आंदोलकांचे घूमजाव
रेप्टाकॉस अथवा मुल्लाबाग येथे स्मशानभूमी व्हावी अशी आमची भूमिका नव्हती, अशी भूमिका स्मशानभूमी बचाव संघर्ष समितीने घेतली.
काही पक्षांनी व बिल्डरांनी आंदोलकांना हाताशी धरून अफवा पसरवल्याचा आरोप त्यांनी केला.