उल्हासनगरात शिंदेसेनेच्या प्रचाररथावर भाजप व कलानी समर्थक भिडले आयलानी व कलानी यांची मध्यस्थी
By सदानंद नाईक | Published: May 10, 2024 06:24 PM2024-05-10T18:24:08+5:302024-05-10T18:24:20+5:30
अखेर आमदार आयलानी व माजी आमदार पप्पु कलानी यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : प्रचार यात्रेतील रथावर खा श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पु कलानी यांच्या उपस्थित भाजप व कलानी समर्थक भिडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला. अखेर आमदार आयलानी व माजी आमदार पप्पु कलानी यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला आहे.
उल्हासनगरात काढलेल्या प्रचार यात्रेतील रथावर खा. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पु कलानी, शहराध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यासह भाजप पदाधिकारी व कलानी समर्थक सहभागी झाले होते. यावेळी भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदिप रामचंदानी, कलानी समर्थक कमलेश निकम यांच्यात तू तू मैं मैं व धक्काबुक्की झाल्याने रथावर हलचल उडाली. आमदार कुमार आयलानी व माजी आमदार पप्पु कलानी यांनी मध्यस्थीची भूमिका वठविल्याने, वादावर पडदा पडला आहे. तसेच खा श्रीकांत शिंदे यांनीही यावेळी सूचना केल्या. कलानी समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांना मतदान करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्याच्या घोषणा केल्या. तर भाजपकडून मोदींसाठी श्रीकांत शिंदे यांना मतदान करण्याच्या घोषणा केल्या जात होत्या.
माजी आमदार पप्पु कलानी व ओमी कलानी यांनी खा. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिल्याने, शहर निवडणुकीत रंगत आली. तर आयलानी व कलानी समर्थक यांच्यात कट्टर वैर असून दोघांतील विस्तव जात नसल्याने, शिंदे यांचे टेन्शन वाढले आहे.