काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कृतीच्या विरोधात भाजपाचे ठाण्यात निषेध आंदोलन
By अजित मांडके | Published: June 19, 2024 05:13 PM2024-06-19T17:13:02+5:302024-06-19T17:15:26+5:30
महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हा शासकीय विश्रामगृहाजवळ आपला निषेध नोंदवला
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याचा निषेधार्थ बुधवारी ठाणे शहरात भाजप महिला मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी नाना पटोले यांचा फोटो फाडून महिलांनी आपला रोष व्यक्त केला. तसेच पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांची माफी मागावी अशी मागणी ही यावेळी महिलांकडून लावून धरण्यात आली.
भाजपा महिला मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हा शासकीय विश्रामगृहाजवळ आपला निषेध नोंदवला. यावेळी पटोले यांचे फोटो फाडण्यात आले. काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यातच अग्रेसर राहिला आहे. दोन पाय आणि दोन हात असलेले नाना पटोले स्वतः हे करू शकले नाहीत का असा सवाल करत या संदर्भात त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजप महिला मोर्चा तर्फे करण्यात आली.
जोपर्यंत पटोले ओबीसी समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा निषेध नोंदवत राहणार अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपच्या वृषाली वाघुले यांनी दिली. अशा पद्धतीने कार्यकर्त्याला वागवणाऱ्या माणसाला त्या पदावर बसण्याचा अधिकार देखील नाही. त्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी केली.