ठाण्यात भाजपने भेदली एकनाथ शिंदेंची तटबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 06:44 AM2022-02-21T06:44:31+5:302022-02-21T06:44:57+5:30

एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातील बालेकिल्ल्यातच भाजपने रविवारी शिवसेनेला धक्का दिला.

BJP breaks Eknath Shinde's ramparts in Thane | ठाण्यात भाजपने भेदली एकनाथ शिंदेंची तटबंदी

ठाण्यात भाजपने भेदली एकनाथ शिंदेंची तटबंदी

Next

मुंबई :  राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातील बालेकिल्ल्यातच भाजपने रविवारी शिवसेनेला धक्का दिला. या मतदारसंघातील किसननगरमधील शाखाप्रमुखांसह सुमारे ३०० शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे तसेच आमदार संजय केळकर यांनी त्यांचे स्वागत केले.

 शिवसेनेच्या किसननगर क्रमांक दोनचे शाखाप्रमुख समीर नार्वेकर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातील युवा सेनेचे निरीक्षक नीलेश लोहोटे, उपशाखाप्रमुख पंकज परब, भरत देसाई, आशिष चव्हाण, नीतेश पवार यांच्यासह अन्य शिवसैनिकांचा त्यात समावेश आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यामध्ये किसननगर क्रमांक एक ते तीन तसेच पडवळनगरमधील शिवसैनिकांचा समावेश आहे.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. किसननगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. किसननगरमधूनच नगरविकासमंत्री शिंदे यांची महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवड होत होती. या भागात शिवसेनेचे संघटनात्मक जाळे मजबूत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. मात्र, भाजपने या अभेद्य तटबंदीलाच खिंडार पाडले. शाखाप्रमुखानेच भाजपात प्रवेश केल्याने  शहरात शिवसेनेला हादरा बसल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या खोपट कार्यालयाच्या परिसरात वागळे इस्टेटमधील शिवसैनिकांनी गर्दी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेत खळबळ उडाली होती.

‘प्राथमिक आश्वासनेही पूर्ण नाहीत’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून देशाचा विकास सुरू आहे, तर शिवसेनेकडून नागरिकांना दिलेली प्राथमिक आश्वासनेही पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे आपण भाजपाचे कार्य करणार असल्याचा दावा समीर नार्वेकर यांनी केला.

Web Title: BJP breaks Eknath Shinde's ramparts in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.