ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा; संख्याबळानुसार केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:05 AM2019-10-31T00:05:00+5:302019-10-31T06:20:03+5:30

गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, संजय केळकर स्पर्धेत

BJP claims over guardianship of Thane district; Order made by numerical order | ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा; संख्याबळानुसार केली मागणी

ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा; संख्याबळानुसार केली मागणी

Next

ठाणे : जिल्ह्याचे पालकमंत्रीपद यावेळी शिवसेनेकडे नव्हे तर भाजपकडे यायला हवे, याकरिता भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे सोपवले जाणार असेल तर बदलत्या राजकीय परिस्थितीत पालकमंत्री भाजपचा व्हावा, अशी या आमदारांची इच्छा आहे. ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाकरिता गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे व संजय केळकर यांच्यात चुरस असल्याचे भाजपच्या वर्तुळात बोलले जात आहे.

नाईक यांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडली तर जिल्ह्यातील शिंदेशाहीला शह देण्याचा ते प्रयत्न करतील. मात्र शिंदे यांच्या गळ््यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडली तर सरकार व्यवस्थित चालवण्याकरिता कदाचित शिंदे यांच्याकडेच पालकमंत्रीपद ठेवले जाऊ शकते किंवा त्यांना डोकेदुखी ठरेल, अशा व्यक्तीकडे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री सोपवणार नाहीत, अशी चर्चाही सध्या रंगत आहे.
ठाणे जिल्ह्याचे नवे पालकमंत्री कोण? या चर्चेचा फड रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे की संजय केळकर अशी वेगवेगळी नावे चर्चेत आहेत. पालकमंत्रीपद शिवसेनेकडे राहिले तर शिंदे हेच पुन्हा होतील. मात्र भाजपकडे पालकमंत्रीपद जाणार असेल तर जिल्ह्यात चुरस निर्माण झाली आहे. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सद्यस्थितीत या जिल्ह्यात तीनपैकी दोन खासदार शिवसेनेचे आणि एक खासदार भाजपचा आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद खेचून आणले. भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांचे पालकमंत्रीपद गेले होते. शिवसेना कालांतराने सत्तेत सहभागी झाली. जिल्ह्यातील संख्याबळानुसार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक भाजपमध्ये दाखल झाले आणि ऐरोली विधानसभेतून निवडून आले आहेत. शिवाय शिवसेनेचा गड समाजाला जाणाऱ्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर भाजपचे संजय केळकर यांनी पुन्हा कब्जा केला. एकनाथ शिंदे सुद्धा कोपरी-पाचपाखाडीतून निवडून आले आहेत.

ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये तिकिटाचे वाटप समसमान झालेले असले तरी सेनेच्या वाट्याला आलेल्या ९ पैकी कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा, शहापूर आणि भिवंडी पूर्व अशा ४ जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा मीरा-भार्इंदर मतदारसंघात पराभव झाला. भाजपचे नरेंद्र मेहता यांच्या विरोधात भाजपच्याच गीता जैन यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली व त्या विजयी झाल्या.

गणेश नाईक यांना पालकमंत्री म्हणून ठाण्यात कामाचा अनुभव आहे. मात्र नाईक हे मूळच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून स्थानिक भाजप नेत्यांशी त्यांचे संबंध जुळले तरच नाईक यांच्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते. केवळ शिवसेनेची डोकेदुखी वाढवणे हा उद्देश असेल तर नाईक यांच्या गळ््यात भाजप पालकमंत्रीपदाची माळ घालेल. ठाणे शहर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून संजय केळकर दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. केळकर हे मूळ भाजपचे असल्याने त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली गेली तर त्याचा आनंद भाजप व रा. स्व. संघाच्या जुन्याजाणत्यांना होईल. डोंबिवलीतील रवींद्र चव्हाण हे यापूर्वी पालघर व रायगडचे पालकमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी ठाणे जिल्ह्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. गेल्या पाच वर्षांत कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर वगैरे महापालिकांच्या निवडणुकीत शिंदे विरुद्ध चव्हाण असा संघर्ष झाला होता. मुरबाडचे किसन कथोरे तिसºयांदा जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडूून आले आहेत. यापूर्वी कथोरे यांना मंत्रीपद मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचा मूळात मंत्रिमंडळात समावेश होणार का व त्यानंतर लागलीच त्यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार का, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. शिवसेनेतूनही पालकमंत्री पदाकरिता शिंदे यांना स्पर्धक असल्याची चर्चा आहे. तिसºयांदा निवडून आलेले प्रताप सरनाईक यांचाही पालकमंत्रीपदावर डोळा असल्याची चर्चा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करावे लागणार दोन हात
शिवसेनेच्या राजकारणात सुभाष देसाई यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवले गेले तर एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याकरिता ठाण्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच ठेवण्याचा आग्रह शिवसेना धरु शकते. भाजपला शिवसेनेची मदत हवी असल्याने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिंदे यांचे संबंध सौहार्दपूर्ण असल्याने ती मागणी भाजपही मान्य करील. पालकमंत्रीपद शिंदे यांनी राखले तरी नाईक, चव्हाण, कथोरे व केळकर यांच्याशी त्यांना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन हात करावे लागणार आहेत, हे चित्र स्पष्ट दिसत आहे.

 

Web Title: BJP claims over guardianship of Thane district; Order made by numerical order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.