बदलापूरात भाजपा सत्तेतून बाहेर; नगराध्यक्षपदी राऊत आणि उपनगराध्यक्षपदी सुनिल भगत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 06:32 PM2017-11-21T18:32:24+5:302017-11-21T18:58:26+5:30
कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विजया राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनिल भगत यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली.
बदलापूर : कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विजया राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनिल भगत यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. सत्तेत असलेल्या भाजपाने सत्तेतुन बाहेर पडत विरोधी पक्षाची भूमीका बजावण्याचा निर्णय घेतला. तसेच निवडणूकीच्या सभेला गैरहजर राहण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्यामुळे सभागृहात केवळ शिवसेनेचेच नगरसेवक उपस्थित होते.
कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वतीने विजया राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंह गिरासे यांनी त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले. तर उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक सुनिल भगत यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड झाली. भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत असतांनाही त्यांनी अचानक सत्तेतुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपाने सत्तेत राहुन सभापतीपद आणि उपनगराध्यक्षपदही मिळविले होते. मात्र या निवडणूकीत भाजपाने निवडणूकीवर बहिष्कार टाकत सत्तेतुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान या संदर्भात शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, भाजपाला उपनगराध्यक्ष पद देण्यात आलेले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणार्पयत त्यांच्याकडुन कोणीच चर्चेला आले नाही आणि उमेदवारही दिला नाही. त्यामुळे शिवसेनेने उमेदवार दिला आहे. सत्तेत राहायचे की नाही हा भाजपाचा वैयक्तीक प्रश्न आहे.
भाजपाचे शहर प्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले की शिवसेनेचा कारभार योग्य नव्हता. शहराच्या विकासाला खिळ बसत असल्याने आम्ही सत्तेतुन बाहेर पडल्याचे स्पष्ट केले.