भाजपा नगरसेवकासह कुटुंबास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 03:13 AM2018-10-23T03:13:58+5:302018-10-23T03:14:08+5:30
अनाथ पोलीस कन्येला मारहाण केल्याबद्दल भाजपा नगरसेवक दौलत गजरे, त्याची पत्नी कमल व मुलगी आकांक्षा यांना काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे.
मीरा रोड : अनाथ पोलीस कन्येला मारहाण केल्याबद्दल भाजपा नगरसेवक दौलत गजरे, त्याची पत्नी कमल व मुलगी आकांक्षा यांना काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. दसऱ्याच्या दिवशी देवी विसर्जनाच्या वेळी ही घटना घडली होती. सुरुवातीला पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. मात्र मुलीवरील अन्यायाला सोशल मीडियातून वाचा फुटल्यानंतर शिवसेना, मराठा मोर्चाचे आयोजक आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली.
मीरारोडच्या सुंदर सरोवर वसाहतीमध्ये सायली राजेंद्र घाग ही लहान भावासह राहते. सायलीचे वडील हे पोलीस दलात होते. तिच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने शेजारच्यांनी सायली व तिच्या भावाचे लहानपणापासून पालनपोषण केले.
वसाहतीत दसºयाच्या दिवशी गरबा आयोजित केला होता. त्यावेळी सायली ही मैत्रिणींसह नाचत होती. साडेदहाच्या सुमारास गाणी बंद केली म्हणून सायली व तिच्या मैत्रिणी वाढदिवसाचे राहिलेले गाणे तरी पूर्ण करु द्या, असे सांगू लागल्या. त्यावरुन वसाहतीत राहणारे भाजपाचे प्रभाग १८ चे नगरसेवक गजरे यांच्या पत्नी कमल यांनी सायलीला शिवीगाळ करुन मारहाण केली. गजरे यांची मुलगी आकांक्षा हिने पण मारहाण केली तसेच सायलीच्या गळ््याभोवती दुपट्टा आवळला. सायलीच्या मैत्रिणी व अन्य लोकांनी तिची सुटका केली. त्यानंतर सायली आपल्या मैत्रिणीसह टाक्या धूत असताना कमल व आकांक्षा यांनी पुन्हा मारण्यास सुरवात केली. नगरसेवक गजरे यांनी त्यांना चिथावणी देऊन ‘तुला नग्न करुन मारु’, असे धमकावले. सायलीचे कपडे फाडण्यात आले. पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. घडल्या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर मराठा मोर्चाने आक्रमक पावित्रा घेतला. गजरे यांनी अॅट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.
>खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक यांच्यासह शिवसैनिकांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात जाऊन गजरेला अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी विविध कलमांखाली गजरे, त्याची पत्नी व मुलगी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली. गजरेने पोलिसांच्या गाडीत बसण्यावरुन शिंगारे यांच्याशी हुज्जतही घातली.