भाजपचे नगरसेवक ब्लॅकमेलर - आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:34 AM2019-07-20T00:34:42+5:302019-07-20T00:34:45+5:30

प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांपैकी कोणाला वाढीव कालावधी दिला, असा सवाल उपस्थित करणा-या भाजपच्या नगरसेवकांचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी महासभेत चांगलेच कान टोचले.

BJP corporator Blackmailer - Commissioner | भाजपचे नगरसेवक ब्लॅकमेलर - आयुक्त

भाजपचे नगरसेवक ब्लॅकमेलर - आयुक्त

Next

ठाणे : प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांपैकी कोणाला वाढीव कालावधी दिला, असा सवाल उपस्थित करणा-या भाजपच्या नगरसेवकांचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी महासभेत चांगलेच कान टोचले. ब्लॅकमेलिंग करून उद्देश साध्य करण्याऐवजी नैतिक मार्गाने उन्नती साधा, असे खडेबोल ‘पार्टी विथ डिफरन्स’ असलेल्या भाजपच्या नगरसेवकांना सुनावले. आयुक्तांची बोलणी चांगलीच झोंबल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे आयुक्तांनीही सर्वच अधिकाऱ्यांना घेऊन महासभेवरच बहिष्कार टाकला.
शुक्रवारी महासभा सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तरांच्या अनुषंगाने भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाºयांचा कालावधी संपल्यानंतरही कोणाला वाढीव मुदतवाढ दिली, असा सवाल केला. यावर प्रशासनाच्या वतीने वर्षा दीक्षित यांनी उत्तर दिले. परंतु, त्यावर त्यांचे समाधान झाले नाही. उलट, माझा प्रश्न तुम्हाला समजलाच नाही, असे त्यांनी सांगितले. अखेर, आयुक्त जयस्वाल यांनी पाटील यांचा प्रश्न वाचून एकाच अधिकाºयाला मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट केले. परंतु, यावरही समाधान न झाल्याने माझा प्रश्न व्यवस्थित वाचा, एकच अधिकारी आहे का? आणखी काही अधिकारी आहेत, असा उलट सवाल केला. त्यानंतरही आयुक्तांनी तेच उत्तर दिले. त्यावर तुम्ही दिलेले उत्तर चुकीचे असल्याचा दावा पाटील यांनी केला. त्यानंतर मात्र आयुक्तांचा पारा अनावर झाला. त्यांनी तुमचा प्रश्न काय आहे, हे मला समजले आहे आणि असे तुम्ही का विचारत आहात, त्यामागचा तुमचा हेतूही मला माहीत असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले. परंतु, त्यानंतरही ते आपल्या प्रश्नावर अडून राहिले. त्यामुळे आयुक्तांचा राग अनावर होऊन त्यांनी तुमचा हेतू ब्लकमेलिंगचा वाटत असल्याचे सांगून अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग करून आपला उद्देश साध्य करण्यापेक्षा नैतिक मार्गाने उन्नती साधा, असा सल्ला दिला. हे उत्तर चांगलेच झोंबल्याने भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आयुक्तांनी अशा भरसभागृहात नगरसेवकाला असे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगून गटनेते नारायण पवार यांनी आयुक्तांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. यावर आयुक्तांनीही संतापून आधी तुम्ही माफी मागा, असा सूर लावून अधिकाºयांना घेऊन महासभेवरच बहिष्कार टाकला.
>वेळीच आवर न घातल्याने वातावरण तापले
दरम्यान, महासभा सुरू झाल्यानंतर भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनीही पुन्हा हिरानंदानी पार्कच्या मुद्याला हात घातला होता. त्यावेळेसही आयुक्त आणि मणेरा यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. तेव्हासुद्धा आयुक्तांनी तुमचा प्रश्न विचारण्यामागचा हेतू मला समजू शकत आहे. माझ्याकडे त्याबद्दल काही माहिती असल्याचा आरोप करून त्याचे पुरावेसुद्धा मी सभागृहात दाखवू शकतो, असेही सुनावले. यावर मणेरा यांनीसुद्धा तुम्ही ते पुरावे दाखवाच, असे आव्हान आयुक्तांना दिले. मात्र, यानंतर इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने यावर पडदा पडला. परंतु, एकाच वेळेस भाजपच्या नगरसेवकांवर आयुक्तांनी अशा प्रकारे ब्लॅकमेलिंगचा आरोप केल्याने सभागृहात भाजपा विरुद्ध आयुक्त असा सामना रंगला. वास्तविक पाहता मणेरा यांनी विचारलेल्या प्रश्नावर आयुक्तांनी शंका उपस्थित केली, तेव्हाच भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांवर आवरण्याची गरज होती. परंतु, त्यांनी तसे न केल्याने हा वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले.
>शिवसेनेचे मौन : नगरसेवकांनी विचारलेल्या माहितीबाबत आयुक्तांनी ब्लॅकमेलिंग असा आरोप केल्याने हा सभागृहाचा अवमान ठरल्याचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी केली. परंतु, यावेळी शिवसेनेने मात्र मौन बाळगले. उलट, दबक्या आवाजात ज्या वेळेस प्रस्तावावर अनुमोदक म्हणून भाजपा सदस्यांकडे सही मागितली, तेव्हा आपली युती कुठे आहे, असे सांगून ती केली नाही, म्हणून आता आम्ही मदत का करायची, असे सांगून शिवसेनेने भाजपला सभागृहात एकाकी पाडले.
>महापौरांनी सुनावले खडेबोल : महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आधीच्या सभेची आठवण करून देत, मागील सभेतही अशा पद्धतीने सभागृहात माझा अपमान झाला होता. परंतु, त्यावेळेस मी निघून गेल्यानंतरही आपण आयुक्त आल्यानंतर सभा सुरू ठेवली. त्यावेळेसच आपण विरोध का केला नाही, असे खडेबोल भाजपच्या नगरसेवकांना सुनावले. एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत मी सदस्यांच्या बाजूने बोलत असेल, तर सदस्यच काही वेळा नंतर आयुक्तांच्या बाजूने झुकते माप देतात. मग, मी सदस्यांच्या बाजूने तरी का बोलावे, असा सवालही त्यांनी केला.

Web Title: BJP corporator Blackmailer - Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.