माजी आ. नरेंद्र मेहतांच्या विरोधात भाजपच्याच नगरसेविकेची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 11:37 PM2020-02-25T23:37:05+5:302020-02-25T23:39:26+5:30
अत्याचार केल्याचा आरोप : पोलीस महानिरीक्षकांकडे केली तक्रार
मीरा रोड : मीरा भार्इंदरमधील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात भाजपच्याच नगरसेविका निला सोन्स यांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्याकडे मंगळवारी गंभीर तक्रार केली. मेहतांकडून काही वर्षांपासून आपल्यावर अत्याचार होत असून, मला आणि कुटुंबाच्या जिवाला धोका असल्याचे सोन्स यांनी म्हटले आहे. मेहतांची अनैतिक कामे उघड करण्यासाठी आपण स्टिंग ऑपरेशन करुन ते पक्षश्रेष्ठींना दिल्याचा दावाही सोन्स यांनी केला आहे.
मीरा भार्इंदर मनपाच्या महापौर, उपमहापौर पदासाठी एकीकडे भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस असताना सोमवारी सायंकाळी मेहता यांनी फेसबूकवर पोस्ट टाकून आपण भाजप तसेच राजकारणाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. माझ्या आचरणामुळे भाजपचे नुकसान होत आहे. माझ्यामुळे पक्षाच्या नेत्यांना मान खाली घालावी लागेल, असे काही मी सहन करु शकत नाही, असे मेहतांनी या पोस्टमध्ये म्हटल्याने त्यांनादेखील पुढच्या घटनाक्रमाचा अंदाज आला असल्याची शक्यता आहे. सोन्स यांनी गंभीर आरोप करणारी त्यांची व्हिडीओ क्लिप भाजप नेत्यास दिल्यानंतर तासाभराच्या आत मेहतांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली होती.
महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी खबरदारीचा भाग म्हणून गोव्याला पाठवलेल्या भाजप नगरसेवकांना आणून वरसावे येथील मेहतांच्या सी एन रॉक हॉटेलमध्ये ठेवले होते. सोमवारी सायंकाळी राजकारण सोडण्याची घोषणा करणारे मेहता मंगळवारी मात्र सी एन रॉक हॉटेलमध्ये भाजप नगरसेवकांसह माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत उपस्थित होते. भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील म्हणाले की, आम्ही नगरसेवकांनी आणि चव्हाणांनी पक्ष सोडू नका, तुमची गरज आहे, असा आग्रह मेहतांकडे धरला होता.
मेहता हे भाजपच्या आड अनैतिक व गैरप्रकार करत असल्याचे पक्षाच्या वरिष्ठांना आपण कळवले होते. जनतेने नाकारलेल्या मेहतांना या अनैतिक व गैरकृत्यांमुळे पक्षाने पण नाकारावे, अशी त्यांची मागणी होती. माझी मेहतांशी लढाई ही माझा मान व जिवासाठी आहे. माझ्या व मुलाच्या हक्काची लढाई आहे. यातून प्रत्येक महिला जिचे शोषण झाले तिला ताकद मिळेल असे सोन्स यांनी म्हटले आहे. यासंदर्भात नरेंद्र मेहता यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु ते प्रतिसाद देत नव्हते.