शिवसैनिकांकडून भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:45 AM2021-08-25T04:45:38+5:302021-08-25T04:45:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून संतप्त झालेल्या उल्हासनगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्या पुतळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून संतप्त झालेल्या उल्हासनगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्या पुतळा व प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले. शिवसेनेवर सातत्याने टीका करणारे भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना त्यांच्या कार्यालय व महापालिका मुख्यालयासमोर अगदी रस्त्यावर पाडून शिवसैनिक व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटनाही मंगळवारी घडली आहे.
राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा उल्हासनगर शिवसेनेने निषेध करत जोडो मारो आंदोलन केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशिवसेनाप्रमुख दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, राजेंद्र शाहू यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते, तर दुसरीकडे शिवसेनेवर नियमित आरोप करणारे भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना त्यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिक व युवा सैनिकांनी अंगावर शाई टाकून मारहाण केली. रामचंदानी यांचे कार्यालय महापालिका मुख्यालय बाहेर आहे. त्यांना मारहाण झाली. त्यावेळी महापालिकेत भाजपचे आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस उपायुक्त डी. टी. टेळे उपस्थित होते.
मारहाणीनंतर प्रदीप रामचंदानी यांना मध्यवर्ती पोलिसांनी पोलीस सरंक्षणात पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी शिवसेना पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. रामचंदानी यांच्या मारहाणीचा भाजपकडून निषेध व्यक्त होत आहे, तर शिवसैनिकांनी धडा शिकविल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या शहर नेत्यांनी दिली. माझ्यावरील हल्ल्याचा कायद्याने जबाब देणार असल्याची प्रतिक्रिया रामचंदानी यांनी दिली.