तक्रार देण्यास गेलेल्या भाजप नगरसेवकाला टाकले लॉकअपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 04:09 AM2020-08-16T04:09:23+5:302020-08-16T04:09:46+5:30

आमदारांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधातही कोविडकाळात गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

BJP corporator who went to lodge a complaint was thrown into lockup | तक्रार देण्यास गेलेल्या भाजप नगरसेवकाला टाकले लॉकअपमध्ये

तक्रार देण्यास गेलेल्या भाजप नगरसेवकाला टाकले लॉकअपमध्ये

Next

कल्याण : पूर्वेतील भाजप नगरसेवक मनोज राय हे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी त्यांनाच लॉकअपमध्ये टाकले. हा प्रकार कळताच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज साळवे यांना चांगलेच फैलावर घेतले. आमदारांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधातही कोविडकाळात गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
व्यवसायाने बिल्डर असलेल्या राय यांचा एका जागेवरून काही लोकांशी वाद सुरू आहे. या वादाचे रूपांतर शुक्रवारी दुपारी हाणामारीत झाले. राय हे आपली मुले, कार्यकर्त्यांसोबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल नसताना व त्यांची तक्रार न घेताच थेट त्यांच्या दोन मुलांसह त्यांना लॉकअपमध्ये टाकले. हा प्रकार कळताच गायकवाड यांनी पोलीस ठाणे गाठून तेथे त्यांनी साळवे यांना चांगलेच सुनावले.
याप्रकरणी राय आणि त्यांच्या विरोधकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राय यांच्याविरोधात गजानन म्हात्रे यांच्यासह त्यांच्या साथीदारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तर, राय यांच्या तक्रारीवरून गजानन म्हात्रे यांच्यासह अन्य जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात येऊन गर्दी जमविली. तसेच मास्कही घातले नव्हते. गर्दी जमविल्याप्रकरणी पोलिसांनी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
>यासंदर्भात गायकवाड म्हणाले की, मी एकटाच तेथे जाब विचारण्यासाठी गेलो होतो. एखाद्या प्रकरणात जाब विचारणे चुकीचे असेल, तर माझ्याविरोधात जो गुन्हा दाखल झाला आहे, त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. ज्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत, ते पोलीस ठाण्यात बसतात. तक्रार करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांनाच लॉकअपमध्ये टाकले जाते. हा कुठला न्याय, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

Web Title: BJP corporator who went to lodge a complaint was thrown into lockup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.