बुलेट ट्रेनवरून श्रेष्ठींकडून भाजप नगरसेवकांची कानउघाडणी, प्रस्तावावरून वरातीमागून घोडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 12:54 AM2020-12-25T00:54:12+5:302020-12-25T00:54:33+5:30

Bullet Train : ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावांतून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे.

BJP corporator's address by Shrestha from Bullet Train, horses behind the show | बुलेट ट्रेनवरून श्रेष्ठींकडून भाजप नगरसेवकांची कानउघाडणी, प्रस्तावावरून वरातीमागून घोडे

बुलेट ट्रेनवरून श्रेष्ठींकडून भाजप नगरसेवकांची कानउघाडणी, प्रस्तावावरून वरातीमागून घोडे

Next

ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव अखेर सत्ताधारी शिवसेनेने दप्तरी दाखल केला आहे. परंतु, महासभेला उपस्थित असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी विरोध करण्याचे सोडून मौन धारण केले होते. आता पक्षश्रेष्ठींनी कानउघाडणी केल्यानंतर वरातीमागून घोडे नाचवून पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांना शिवसेनेने राजकीय आकसापोटी हा प्रस्ताव दप्तरी दाखल केल्याचा साक्षात्कार झाला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावांतून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. यात महापालिकेच्या मालकीची शीळ भागातील ३८४९ चौरस मीटर इतकी जागा बाधित होणार आहे. ती एनएचएसआरसीएलला देऊन त्याबदल्यात सहा कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मोबदला घेण्याचा ठराव चौथ्यांदा महासभेसमोर आला 
असता महापौरांनी तो दप्तरी 
दाखल करून मोदींच्या स्वप्नास सुरुंग लावला. विशेष म्हणजे भाजपच्या संजय वाघुले वगळता इतर नगरसेवकांनी चर्चेत सहभागी न होता मौन बाळगले होते.
भाजपच्या या भूमिकेबाबतही आता शंका उपस्थित केली जात आहे. मुळातच मागील चार महासभांस गैरहजर राहणारे पक्षाचे नगरसेवक खास या प्रस्तावाच्या बाजूने आपली मते मांडण्यासाठी हजर झाले होते. परंतु, महासभेत वाघुले वगळता इतरांनी भूमिका न मांडता मौन बाळगणे पसंत केले.

विरोध म्हणजे शिवसेनेच्या अकलेचे दिवाळे
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा देण्यास नकार देणाऱ्या ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या ‘अकलेचे दिवाळे’ निघाले आहे. एकीकडे केंद्र सरकारकडे मदत मागायची आणि दुसरीकडे केंद्राच्या प्रकल्पांना मोठ्या अविर्भावात परवानगी नाकारायची, या प्रकारातून शिवसेना नेत्यांचे भोंगळ धोरण स्पष्ट होत आहे. विकास प्रकल्पांना विरोध करून आपण मुंबई-ठाण्याला कोठे नेत आहोत, याचे शिवसेनेच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे.         - निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष, भाजप

बुलेट ट्रेनला जागा देण्याच्या प्रस्तावावर वेबिनार महासभेत चर्चाही झाली नाही. मात्र, संबंधित प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याच्या प्रस्तावाला भाजपचा पाठिंबा असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांचे वक्तव्य खोटे आहे.
- संजय वाघुले, गटनेते, भाजप

बुलेट ट्रेनचा लाभ होणार, व्यापार उद्योग वाढीस लागणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचे भाव वाढतील. हा प्रस्ताव दप्तरी दाखल करून ठाणेकरांचे हित साधले की अहित, याचा विचार महापौरांनी केला पाहिजे. ही केवळ राजकीय कृती आहे.
- संदीप लेले, नगरसेवक, भाजप
 

Web Title: BJP corporator's address by Shrestha from Bullet Train, horses behind the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.