भाजपा नगरसेवकांकडूनच २७ गावांशी गद्दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 02:49 AM2018-08-05T02:49:30+5:302018-08-05T02:49:47+5:30
केडीएमसी हद्दीतील २७ गावांची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत कोकण आयुक्तांकडे हरकती, सूचना यावर कार्यवाही सुरू आहे
डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत कोकण आयुक्तांकडे हरकती, सूचना यावर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. पण, तरीही २७ गावांतील युवकांना मात्र भाजपाच्या दुटप्पी भूमिकेबद्दल शंका आहे. भाजपाचे नगरसेवकच २७ गावांशी गद्दारी करत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी केला. स्वतंत्र नगरपालिकेबाबत सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाच्या वार्तालापामध्ये पाटील यांनी ही भूमिका मांडली. केडीएमसीच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने खेळी करत संघर्ष समितीला अंधारात ठेवले. अचानक उमेदवार उभे केले. निवडून आलेले नगरसेवक आधी २७ गावांच्या नगरपालिकेबाबत अत्यंत आक्रमक होते. मात्र, निवडून आल्यानंतर काही नगरसेवकांनी मूळ भूमिकेपासून ‘यू-टर्न’ घेत ती गावे महापालिकेतच राहावी, अशी भूमिका घेतली. मुळात महापालिका आधीच शहरी भागांत सोयीसुविधा देत नाही, ती या गावांमध्ये नव्याने काय सोयीसुविधा देणार, असा प्रश्न पाटील यांनी केला.
सध्या गावांची स्थिती वाळीत टाकल्यासारखी झाली आहे. सुविधांअभावी पार बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायत असताना गावांची स्थिती उत्तम होती. मात्र, तीन वर्षे पालिकेत येऊन अक्षरश: आमची वाट लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
>‘तो’ मॉल बंद करा
कल्याण-शीळ मार्गावर मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. त्याला निळजे येथील मॉल जबाबदार आहे. शिवाय तेथील गृहसंकुलातील लोकसंख्या वाढली आहे. मात्र, वाहतुकीचे नियोजन केलेले नाही. हा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत तो मॉल बंद ठेवावा, अशी मागणीही पाटील यांनी केली. याबाबतही लवकरच राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे ते म्हणाले.