भाजपा नगरसेवकांचे राजीनामास्त्र? कामे होत नसल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 03:28 AM2018-08-29T03:28:38+5:302018-08-29T03:28:54+5:30

BJP corporators resign? There is no scope for work in kdmc | भाजपा नगरसेवकांचे राजीनामास्त्र? कामे होत नसल्याने संताप

भाजपा नगरसेवकांचे राजीनामास्त्र? कामे होत नसल्याने संताप

googlenewsNext

कल्याण : विकासकामांच्या फाइल्स मंजूर केल्या जात नसल्याने स्थायी समितीचे सभापती राहुल दामले आणि भाजपाच्या नगरसेवकांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांना दिला आहे. दामले यांनी प्रशासनाला विचारात घेऊन अर्थसंकल्प तयार केला. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ हा काळ आर्थिक चणचणीचा होता. त्यामुळे विकासकामे झाली नाहीत. तोच कित्ता पुन्हा गिरवला जाऊ नये, यासाठी प्रत्येक प्रभागात एक कोटीची विकासकामे करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. त्यामुळे एप्रिलपासून नगरसेवक कामांसाठी पाठपुरावा करीत आहेत. परंतु, अधिकारी त्यांना दाद देत नाहीत. आयुक्तांचा त्यांच्यावर वचक नाही. गटारे व पायवाटांच्या फाइल मंजूर होत नाहीत. आयुक्तांनी कामांच्या फाइल्स अडवून धरल्याने नगरसेवकांना त्यासाठी विविध विभागांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत.

महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता आहे. तरीही भाजपाच्या नगरसेवकांना प्रशासन काडीमात्र दाद देत नसल्याचे चित्र महापालिकेत आहे. शिवसेनेच्या महापौर विनीता राणे यांनी १५ दिवसांपूर्वी आयुक्तांसोबत बैठक घेऊन अडलेल्या फाइल्स मार्गी लावा, असे सांगितले होते. त्यावेळी एक कोटीची कामे प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात तातडीने मंजूर केली जातील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर महासभेत आयुक्तांनी कोणतीही फाइल्स त्यांच्या टेबलावर रोखून धरली जात नाही. ती तातडीने मार्गी लावली जाते. तीन दिवसांपेक्षा जास्त काळ फाईल पडून राहत नाही, असा खुलासा केला होता. त्यानंतरही भाजपा नगरसेवकांमध्ये आयुक्तांच्या फाइल्स रोखीवर तीव्र नाराजी आहे. त्यामुळे दामले व भाजपाच्या ४२ नगरसेवकांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा आयुक्तांना दिला आहे.

आज होणार बैठक
भाजपाच्या नगरसेवकांनी राजीनाम्याचा इशारा दिला असला या संदर्भात बुधवारी भाजपाचे खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार व सर्व नगरसेवकांची एक बैठक आयुक्तांसोबत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: BJP corporators resign? There is no scope for work in kdmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.