महाविकास आघाडीला दे धक्का! अल्पमतात असूनही भाजपाची सरशी; शिवसेना तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:52 AM2020-01-04T03:52:44+5:302020-01-04T06:46:39+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समिती बळकावली

bjp defeated shiv sena in kdmc standing committee election | महाविकास आघाडीला दे धक्का! अल्पमतात असूनही भाजपाची सरशी; शिवसेना तोंडघशी

महाविकास आघाडीला दे धक्का! अल्पमतात असूनही भाजपाची सरशी; शिवसेना तोंडघशी

Next

कल्याण : राज्यातील महाविकास आघाडीच्या पॅटर्ननुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीवर राज्य करण्याचे शिवसेनेचे स्वप्न भाजपने शुक्रवारी धुळीस मिळवले. काँग्रेस आणि मनसेच्या बळावर अल्पमतातील भाजपने सभापतीपद बळकावले. गाफील असलेल्या शिवसेनेवर मात्र बहुमत असूनही तोंडघशी पडण्याची नामुष्की ओढवली.

राज्यातील शिवसेना-भाजप युती तुटल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरले होते. स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे आठ, भाजपचे सहा आणि मनसे तसेच काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून गणेश कोट यांनी तर, त्यांच्याविरोधात भाजपचे विकास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. शुक्रवारी ऐन निवडणुकीवेळी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे हे आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाल्याने गैरहजर राहिले. त्यामुळे शिवसेनेचे एक मत कमी झाले. मात्र, तरीही राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न कल्याण-डोंबिवलीत राबवून आपलाच विजय होईल, असा ठाम विश्वास शिवसेनेला होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत वेगळेच चित्र दिसले. काँग्रेसच्या हर्षदा भोईर आणि मनसेच्या सरोज भोईर यांनी भाजपला मतदान केल्याने आठ मते मिळवून विकास म्हात्रे सभापतीपदी विराजमान झाले.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेला मतदान करण्याचे आदेश त्यांच्या सदस्यांस दिले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच सचिन पोटे आणि त्यांच्या सदस्या हर्षदा भोईर दोघेही निघून गेले. दोघांचेही मोबाइल बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मनसे आणि काँग्रेसने गद्दारी केल्यामुळे पक्षाचा एक सदस्य गैरहजर राहिल्याने आपला पराभव झाल्याचा आरोप शिवसेनेचे गणेश कोट यांनी केला.

मनसेबाबत शिवसेना भ्रमात
राज्यातील महाविकास आघाडीच्या पॅटर्नप्रमाणे मनसे या निवडणुकीतही तटस्थ राहील, या भ्रमात शिवसेना होती. मात्र, मनसेने भाजपला मतदान करून शिवसेनेला धक्का दिला आहे. विकास म्हात्रे यांचा विजय जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निवडणुकीत भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निवडणुकीपश्चात शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतून काढता पाय घेतला. पराभवाविषयी काहीही भाष्य न करता, याबाबत पक्षाचे नेतेच बोलतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: bjp defeated shiv sena in kdmc standing committee election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.