नगरसेवकाला मारहाण करणाऱ्याचा सत्कार करणाऱ्यावर कारवाईची भाजपकडून मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:11 PM2021-09-08T16:11:43+5:302021-09-08T16:11:59+5:30
भाजप नगरसेवकाला मारहाण करणाऱ्याचा शिवसेना नेत्यांकडून सत्कार झाल्याच्या निषेधार्थ भाजपाने पोलीस उपायुक्त कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढून सत्कार करणाऱ्यावर कारवाईची मागणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : भाजप नगरसेवकाला मारहाण करणाऱ्याचा शिवसेना नेत्यांकडून सत्कार झाल्याच्या निषेधार्थ भाजपाने पोलीस उपायुक्त कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढून सत्कार करणाऱ्यावर कारवाईची मागणी आमदार कुमार आयलानी यांनीं केली. मोर्चामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असून पोलिसांनी कारवाईचे संकेत दिले.
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आदीं विरोधात भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी हे वारंवार सोशल मीडियावर पोस्ट टाकत असल्याच्या रागातून गेल्या महिण्यात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांचे राज्यात आंदोलन करीत होते. त्याच दिवसी काही शिवसैनिक व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या तोंडाला काळे फासून मारहाण केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात उपशहरप्रमुख संदीप गायकवाड, युवाधिकारी बाळा श्रीखंडे, ज्ञानेश्वर मरसाळे आदींसह ८ जनावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. मारहाणी प्रकरणातून न्यायालयाने जामीन दिलेल्या शिवसैनिक व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, नगरसेवक धनंजय बोडारे, राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांच्या हस्ते सत्कार झाला. हा सत्कार भाजपाच्या जिव्हारी लागला असून यातूनच भाजपने मोर्चा काढल्याचे बोलले जात आहे.
भाजपाने थेट पोलीस उपायुक्त कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढून, मारहाण प्रकरणातील आरोपींचा सत्कार करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करून लेखी निवेदन दिले. यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते उपस्थित नसल्याने, भाजप शिष्टमंडळातील आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी आदींनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकाला मारहाण करणाऱ्याचा सत्कार करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ पातळीवरील लावून धरण्याची प्रतिक्रिया आमदार कुमार आयलानी यांनीं दिली. तसेच आम्ही निवेदन देण्यासाठी पोलीस उपायुक्त कार्यालयावर आल्याचे सांगितले. मात्र मोर्चा काढल्याचा इन्कार केला. पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर आलेले शेकडो उत्फुर्त आल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली.
मोर्चा काढणाऱ्यावर गुन्हा?
भाजपच्या मोर्चात शेकडो जण सहभागी झाल्याने, मोर्चा वादात सापडला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप विरोधी पक्षानी केल्यावर, पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले. मोर्चावर गुन्हे दाखल झालेतर, व्हिटीसी मैदानात झालेल्या कार्यक्रम आयोजकावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी केली.