‘पिचड पितापुत्राला भाजपने प्रवेश न देण्याची कोळी समाजबांधवांची मागणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:33 AM2019-08-01T00:33:56+5:302019-08-01T00:33:59+5:30
विशेष म्हणजे, वैभव पिचड यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेशही केला आहे.
ठाणे : राज्यातील विस्तारित क्षेत्रातील पीडित आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमातबांधवांना घटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवून देशोधडीला लावणारे राष्टÑवादीचे नेते, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड तसेच त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये, अशी मागणी आदिवासी महाराष्टÑ कोळी व तत्सम जमातबांधवांच्या वतीने महादेव कोळी समाज संघाचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली आहे.
विशेष म्हणजे, वैभव पिचड यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. त्यामुळेच कुणाला पक्षात प्रवेश द्यावा, कोणाला नाही, कोणाला काढायचे, हा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे, त्यावर बोलण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचेही तरे यांनी म्हटले आहे. परंतु, शिवसेना-भाजप युतीचा एक पदाधिकारी, माजी आमदार, युतीचा माजी महापौर आणि महाराष्टÑ कोळी समाज संघटनेचा राष्टÑीय अध्यक्ष या नात्याने हे निवेदन देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यातील आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमातबांधवांना घटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवून, तसेच समाजबांधवांना व्यवसाय, शिक्षण, नोकरी तसेच राजकारणाच्या सवलतींपासून वंचित ठेवले आहे.
अशा अनेक प्रकारे अन्याय करणाऱ्या स्वत: मधुकर पिचड यांचा जातीचा दाखला मात्र बोगस आहे. त्यांनी आपले देशमुख हे नाव बदलून पिचड हे नाव ठेवले आहे.
दाखल्याची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी यापूर्वीच केल्याची आठवणही तरे यांनी करून दिली आहे. पिचड यांच्या कालखंडात गोवारी समाजाचे हत्याकांड झाले. ते आदिवासी विकासमंत्री असताना त्यांच्यावर आदिवासी खात्यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा, तसेच त्यांनी केलेल्या अनेक प्रकल्पांमधील कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचाही त्यांनी आरोप केला. भाजप- शिवसेना सत्तेकडून आदिवासी महादेव कोळीबांधव तसेच तत्सम जमातबांधवांना न्यायाची अपेक्षा आहे.