कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:19+5:302021-04-24T04:41:19+5:30

ठाणे : कोरोनाचा कहर लक्षात घेऊन शहरात ऑक्सिजन टंचाई, अपुरे बेड, रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई, टोसिलीझुमैब इंजेक्शनचा अनावश्यक वापर ...

BJP discusses Corona's critical condition with District Collector | कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

Next

ठाणे : कोरोनाचा कहर लक्षात घेऊन शहरात ऑक्सिजन टंचाई, अपुरे बेड, रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई, टोसिलीझुमैब इंजेक्शनचा अनावश्यक वापर आदींची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करीत भाजपच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनीही उपस्थिती लावून या संकटावर सर्वांनी एकत्र येऊन मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

ठाणे महापालिकेच्या सहकार्याने भारत विकास परिषदेकडून ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल चालविण्याची तयारी असल्याच्या मुद्यावरही यावेळी सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीस खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार, जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कैलास पवार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रमुख महेश जोशी आदी उपस्थित होते.

टोसिलीझुमैब परिणामकारक नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत डॉक्टरांना आवश्यक निर्देश द्यावेत. ठाण्यातील हॉस्पिटलला गरजेएवढा ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी भाजपने यावेळी केली. कोरोना उपचारासाठी मान्यता नसलेल्या हॉस्पिटलमधील रुग्णांनाही रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. अशा हॉस्पिटलना तातडीने मान्यता देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपने केली. अनेक रुग्णांना केवळ २० टक्के ऑक्सिजनची आवश्यकता आहे. काही रुग्णांना जादा ऑक्सिजन पुरवठा गरजेचा असतो. मात्र, शहरातील बहुसंख्य रुग्णालयात २० टक्के ऑक्सिजनची गरज असलेले अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना उपचार करण्यात अडचणी येतात. या परिस्थितीत ठाणे महापालिकेच्या अंतर्गत भारत विकास परिषदेने २० टक्के ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल चालविण्याची तयारी दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर भारत विकास परिषदेला हॉस्पिटलची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती खासदार सहस्रबुद्धे व आमदार डावखरे यांनी यावेळी केली. या रुग्णालयासाठी आमदार निधी देण्याची तयारी असल्याचेही डावखरे यांनी नमूद केले.

-----------

फोटो ओळी: जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे. सोबत खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी.

Web Title: BJP discusses Corona's critical condition with District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.