"भांडण लावल्याशिवाय भाजपला राजकारण जमत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 12:33 AM2020-03-01T00:33:30+5:302020-03-01T00:33:41+5:30
उच्च न्यायालयाने पाच टक्के मुस्लिम आरक्षण मान्य केल्यानंतरही कायदेशीर सल्ला घेतो म्हणून तत्कालीन भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण आरक्षणाचा विषय पुढे ढकलत होते.
भिवंडी : शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम आरक्षणाबाबत भाजप सरकारच्या काळात उच्च न्यायालयाने पाच टक्के मुस्लिम आरक्षण मान्य केल्यानंतरही कायदेशीर सल्ला घेतो म्हणून तत्कालीन भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण आरक्षणाचा विषय पुढे ढकलत होते. मुस्लिम आरक्षणाबाबत भाजप नेते विनाकारण दिशाभूल करत असून भाजपला भांडण लावल्याशिवाय राजकारण करता येत नाही, अशी टीका अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी येथे केली.
भिवंडीतील बीएनएन महाविद्यालयाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने भरवण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. महापौर प्रतिभा पाटील, उपायुक्त दीपक कुरळेकर, पद्मश्री अण्णासाहेब जाधव संस्थेचे संस्थाध्यक्ष विजय जाधव, कार्याध्यक्ष बी.डी. जाधव, बीएनएन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ, बीएनएन महाविद्यालय कौशल्य विभागप्रमुख विनोद भानुशाली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भगवान टावरे, महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे आदी उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम आरक्षणामुळे राज्यातील एससी, एसटी, मराठा, ओबीसी यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही.
उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातील पाच टक्के मुस्लिम आरक्षण महाविकास आघाडी सरकार कायदेशीर मार्गाने लागू करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. जवळपास ५०० हून अधिक बेरोजगारांना मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर कौशल्य विभागाच्या माध्यमातून बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकारचा असून या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. बेरोजगारी हटवण्यासाठी राज्यातील विविध व्यवसायाभिमुख केंद्रांना प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कौशल्य विकास प्रशिक्षणही आता काळानुसार अत्याधुनिक पद्धतीने देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. या माध्यमातून कुशल आणि प्रशिक्षित युवक तयार होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोजगारासंदर्भात मोठी घोषणा व योजना जाहीर करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. या मेळाव्यात ६५० युवकांनी सहभाग घेतला असून ४० हून अधिक नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.