नेवाळी, मलंगगडवाडी, नाऱ्हेन ग्रा.पं.वर भाजपचे वर्चस्व, बुर्दूल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात; बदलापूर ग्रामीणमध्ये शिवसेेनेचा वरचष्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 09:20 AM2021-01-19T09:20:07+5:302021-01-19T09:21:11+5:30
ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर मलंगगड भागातील नेवाळी, मलंगगडवाडी, नाऱ्हेन या ग्रामपंचायतींवर भाजपने आपले सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहेत.
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यात भाजपचे तर बदलापूर ग्रामीण भागात शिवसेनेने वर्चस्व निर्माण केले आहे. यंदाच्या निवडणुकीत मनसेने काकोळे ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर मलंगगड भागातील नेवाळी, मलंगगडवाडी, नाऱ्हेन या ग्रामपंचायतींवर भाजपने आपले सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा मलंगगडचा बालेकिल्ला ढासळला आहे. नेवाळी ग्रामपंचायतीवर असलेली शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणत भाजपने या ठिकाणी आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. आता बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले असून ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीही शिवसेनेला ताब्यात ठेवण्यात अपयश आले आहे. नेवाळी ग्रामपंचायतीत शिवसेनेला सर्वाधिक फटका बसला आहे. शिवसेना पुरस्कृत पॅनलमधून फक्त दोन उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजप पुरस्कृत पॅनलमधून नऊ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर उसाटने ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. खरड ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची असलेली सत्ता महाविकास आघाडीने कायम ठेवली आहे. नाऱ्हेन ग्रामपंचायतीवर भाजपने आपले सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहेत. बुर्दूल ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवले आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी कौटुंबिक लढाया सर्वाधिक झाल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये सर्वाधिक रंग आले होते.
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व असून भाजप आठ जागांवर, राष्ट्रवादी ४ जागांवर, मनसे एक जागेवर तर महाविकास आघाडी तीन जागांवर विजयी झाली. विजयाची आकडेवारी सरपंच निवडणुकीपर्यंत कायम राहते की घोडेबाजारानंतर ही आकडेवारी बदलते याची उत्सुकता आहे.