उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे वर्चस्व; 18 जागांपैकी 15 जागांवर विजय
By पंकज पाटील | Published: April 30, 2023 08:49 PM2023-04-30T20:49:29+5:302023-04-30T20:49:48+5:30
तीन जागांवर शिवसेनेच्या शिंदे गटाला विजय मिळवता आला आहे.
अंबरनाथ:उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक रविवारी पार पडले या निवडणुकीचा निकाल सायंकाळी लागला असून 18 जागांपैकी 15 जागांवर भाजपाने वर्चस्व निर्माण केले आहे, तर तीन जागांवर शिवसेनेच्या शिंदे गटाला विजय मिळवता आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे.
उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी पार पडली. या निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया अंबरनाथच्या सूर्योदय सभागृहात पार पडली. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ संचालकांच्या जागा असून त्यासाठी ३३ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी भाजपनं सर्वच्या सर्व १८ जागी उमेदवार दिले होते, तर शिवसेनेने ६ जागी उमेदवार दिले असून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १-१ उमेदवार उभा केला होता.
सूर्योदय सभागृहात मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर 18 पैकी 15 जागांवर भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार किसन कथोरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती.
त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील ही निवडणूक जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. अखेर भाजपाने 15 जागा जिंकत पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला झेंडा फडकवलाय. हा विजय खऱ्या अर्थाने आमदार किसन कथोरे यांच्या कुशल नेतृत्वाचा असल्याचे मत भाजपाचे पदाधिकारी राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.