भाजपाला दुहेरी धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:38 AM2017-08-05T02:38:25+5:302017-08-05T02:38:25+5:30
गुन्हे आणि शिक्षणासंदर्भातील माहिती लपवल्याच्या मुद्दयावरून एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्या खेळीत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शरद पाटील यांना अपक्ष म्हणून रिंगणात राहण्याची वेळ आल्याने
मीरा रोड/भार्इंदर : गुन्हे आणि शिक्षणासंदर्भातील माहिती लपवल्याच्या मुद्दयावरून एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्या खेळीत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शरद पाटील यांना अपक्ष म्हणून रिंगणात राहण्याची वेळ आल्याने त्यांनी शिवसेनापुरस्कृत उमेदवार होण्याचा निर्णय घेतल्याने शुक्रवारी भाजपाला दुहेरी धक्का बसला.
दाखल झालेल्या ६७७ अर्जांपैकी ५२ अर्ज छाननीत बाद झाले आणि दोन अवैध ठरविल्याने ६२३ उमेदवार मीरा-भार्इंदर निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
कट करत अपमानास्पदरित्या तिकीट कापल्याबद्दल स्थानिक नेतृत्वावर संताप व्यक्त करत प्रभाग १८ मधून शिवसेनापुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे शरद पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाची पुरेशी ताकद नसतानाही ते गेली २० वर्ष भार्इंदर पूर्वेच्या महात्मा ज्योतीबा फुले मार्ग परिसरातून निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत पाटील यांच्यासोबत मेघना दीपक रावल निवडून आल्या होत्या. प्रभाग ५ मधून पाटील यांना उमेदवारी देण्यास टाळाटाळ करत त्यांना शेवटच्या क्षणी प्रभाग १८ मधून लढण्याची गळ घातली, पण तेथे आधी अर्ज भरलेला उमेदवार गायब झाल्याने पाटील हे भाजपाचे नह्वे, तर अपक्ष उमेदवार ठरले. तेथील रावल, शहा, राय हे सर्व मेहता समर्थक असल्याने आणि पाटील यांच्याविरोधात राय यांना लगोलग अधिकृत उमेदवार म्हणून जाहीरही करून टाकल्याने निष्ठावंत संतापले.
शरद पाटील यांचा अपमानास्पद रितीने पत्ता कापल्याने भाजपात नाराजी आहे. गुरुवारी रात्रीपासून भाजपातील अनेकांची पाटील यांना भेटण्यासाठी रीघ लागली. त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पाटील यांना शिवसेनतर्फे लढण्याचा आग्रह धरला. त्यामुळे १८ ड मधील शिवसेनेचा उमेदवार दीक्षय शिंदे शनिवारी माघार घेणार आहे.