कार्यकर्त्यांना ताकत देण्यात भाजपा कमी पडली; सुरेश बारशिंगे यांचे विधान
By नितीन पंडित | Published: April 2, 2024 05:32 PM2024-04-02T17:32:16+5:302024-04-02T17:32:57+5:30
आरपीआय आठवले गटाचे प्रदेश सचिव सुरेश बारशिंगे यांनी मंगळवारी भिवंडीत व्यक्त केली आहे.
नितीन पंडित, भिवंडी : दहा वर्षात सत्तेत असलेल्या भाजपासोबत मित्रपक्ष म्हणून काम करत असलेल्या आरपीआय आठवले गटातील कार्यकर्त्यांना ताकद देण्यात भारतीय जनता पक्ष कमी पडला आहे, त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांची ताकद राज्यात वाढली नाही अशी खंत आरपीआय आठवले गटाचे प्रदेश सचिव सुरेश बारशिंगे यांनी मंगळवारी भिवंडीत व्यक्त केली आहे.
बारशिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील रिपाई आठवले गटाच्या कार्यकर्ता चिंतन सभेत आयोजन तालुक्यातील कोनगाव येथे करण्यात आले होते. याप्रसंगी रिपाईचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड,सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, विभागीय महिला अध्यक्षा संगीता गायकवाड ,प्रतिभा मोरे राज्य सचिव बाळकृष्ण गायकवाड, दिनेश उघडे,भिवंडी तालुकाध्यक्ष भरत जाधव,सरचिटणीस नारायण जाधव, धनराज गायकवाड, दीपक धनावडे यांच्यासह शहापूर,मुरबाड,कल्याण येथील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन नवे मित्र भेटल्याने त्यांनी जुन्या पक्षाला विसरू नये, भाजपचे नेते, कार्यकर्ते रिपाईच्या कार्यकर्त्यांना सभांना व कार्यक्रमांना बोलवत नाहीत, आरपीआयला डावलले तर आम्ही आमची ताकद दाखवू व ठाणे,कल्याण, भिवंडी व इतर ठिकाणी स्वतंत्र रिपाई उमेदवार उभे करणार असा इशारा देखील यावेळी बारशिंगे यांनी दिला आहे.