शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी अखेर भाजप उतरला मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:48 AM2019-04-16T00:48:13+5:302019-04-16T00:48:36+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे काही काळ नाराज असलेली भाजपची फळी आता त्यांच्या प्रचारासाठी जोमाने कामाला लागली आहे. प्रचाराच्या माध्यमातून भाजपची ही मंडळी आपला पट्टा सांभाळण्यावर भर देताना दिसत आहे.
यामध्ये नगरसेवकांसह आमदारसुद्धा तितक्याच ताकदीने मैदानात उतरले आहेत. परंतु, ज्या पद्धतीने शिवसेनेच्या कार्यालयात प्रचाराची धामधूम दिसून येत आहे, तशी भाजपच्या एकाही कार्यालयात दिसत नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे २३ नगरसेवक नाराज झाले होते. त्यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठून आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती. विचारे यांच्याऐवजी दुसरा कोणताही उमेदवार द्या, त्याच्यासाठी काम करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
ठाण्याच्या गडातच भाजपच्या मंडळींनी ही भूमिका घेतल्याने शिवसेनेपुढील गणिते अवघड ठरण्याची चिन्हे दिसत होती. परंतु, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मध्यस्थी केली आणि काही गोष्टींवर चर्चा झाल्यानंतर या नाराज नगरसेवकांची मनधरणी करण्यात त्यांना यश आले. त्यानंतरही निघणाऱ्या प्रचार रॅलीतून या मंडळींचे प्रमाण कमी दिसत होते. परंतु, आता भाजप आमदारांनी शिवसेना उमेदवारासाठी प्रचारात आघाडी घेतली असून ठाण्यातील मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे नगरसेवकही टप्प्याटप्प्याने बाहेर पडू लागले असून उमेदवार कोणी असो, आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे असल्याने त्यासाठी आम्ही मतदारांपुढे मतांचा जोगवा मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
>मित्रपक्ष जोमाने काम करतोय
भाजप नगरसेवकांमध्ये असलेली नाराजी दूर झाली असून ती मंडळी खºया अर्थाने कामाला लागली आहे. प्रचार, सभा, मीटिंग आदींच्या माध्यमांतून ते प्रचारात सक्रिय झालेले आहेत.
- राजन विचारे, शिवसेना
उमेदवाराच्या प्रचारासाठी आम्ही मैदानात
पक्षाने आदेश दिले आहेत. त्यानुसार, आम्ही काम करत आहोत, मोदींना पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे भाजपची फळी आता जोमाने कामाला लागली आहे. रॅली, मीटिंग आदींच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे.
- संदीप लेले, अध्यक्ष, भाजप, ठाणे
>विधानसभा मतदारसंघांतील मित्रपक्षांच्या कार्यालयांत काय दिसले?
१. बेलापूर : या पट्ट्यात भाजपचे वर्चस्व दिसत असून येथे एक भाजप आमदार आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी येथे जोमात प्रचार सुरू आहे. मात्र, कार्यालयात तसे वातावरण नाही.
२. ऐरोली : ऐरोलीमध्ये भाजपचे तसे फारसे अस्तित्व दिसत नाही. तरीही जी थोडीफार भाजपची मंडळी आहे, ती प्रचारात उतरलेली दिसत आहेत.
३. ठाणे : ठाण्यातील भाजपचे मध्यवर्ती कार्यालय ओस पडले असून त्याठिकाणी निवडणुकीची जराही धामधूम दिसून येत नाही. परंतु, प्रचारात मात्र येथे मुसंडी मारली आहे.
४. कोपरी-पाचपाखाडी : कोपरी-पाचपाखाडीत भाजप आता सक्रिय होत असून येथे नगरसेवकांची कार्यालये आहेत. परंतु, त्याठिकाणीही फारशी हालचाल दिसून आलेली नाही.
५. ओवळा-माजिवडा : या मतदारसंघात ठाण्याचा आणि काही मीरा-भार्इंदरचा भाग येत आहे. त्यामुळे येथेसुद्धा भाजपची मंडळी काम करताना दिसत आहे.
६. मीरा-भार्इंदर : या पट्ट्यात भाजपचा एक आमदार असल्याने तो शिवसेनेसाठी जमेची बाजू मानली जात आहे. परंतु, त्यांच्या कार्यालयात निवडणुकीचा माहोल दिसत नाही.