अखेर भाजपा झुकली; साई पक्षाच्या मागण्या मान्य, रस्ते विकासासाठी १५३ कोटी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:28 AM2018-02-13T03:28:17+5:302018-02-13T03:29:16+5:30
निधी मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाहीत; तर पाठिंबा काढू, असा इशारा साई पक्षाने दिल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत सोमवारी रस्ते विकास, रेल्वे स्टेशन परिसराचा विकासासाठी १५३ कोटी देत अंबरनाथ ते कल्याण रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
उल्हासनगर : निधी मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाहीत; तर पाठिंबा काढू, असा इशारा साई पक्षाने दिल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत सोमवारी रस्ते विकास, रेल्वे स्टेशन परिसराचा विकासासाठी १५३ कोटी देत अंबरनाथ ते कल्याण रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
सत्ता टिकवण्यासाठी भाजपाने साई पक्षाच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे समाधानी असल्याची प्रतिक्रिया साई पक्षाचे नेते आणि उपमहापौर जीवन इदनानी यांनी दिली. कामांची प्रगती पाहून सत्तेतून बाहेर पडण्यावर मार्च अखेरनंतर निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. या बैठकीमुळे उल्हासनगरचा कायापालट होणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार कुमार आयलानी यांनी दिली.
उल्हासनगरच्या ठप्प विकासकामांवरून साई पक्षाने सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देत भाजपाचे प्राण कंठाशी आणले होते. पालिकेवरील सत्ता जाऊ नये म्हणून भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, महापौर मीना आयलानी यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी इदनानी यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला आणि विकासकामांवर निर्णय घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, पालिका आयुक्त राजेद्र निंबाळकर, महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, भाजपचे शहर अध्यक्ष कुमार आयलानी, सभागृह नेता जमनुदास पुरस्वानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, ओमी टीमचे प्रमुख ओमी कालानी, प्रदीप रामचंदानी आदी उपस्थित होते. त्यात १५३ कोटी खर्चून नऊ रस्त्यांचा विकास, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, शहाड या रेल्वे स्टेशनचा विकास, अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचा विकास, तेथील बाधित व्यापाºयांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले.