भिवंडीत भाजपाला आले ‘बुरे दिन’
By admin | Published: June 10, 2017 01:10 AM2017-06-10T01:10:53+5:302017-06-10T01:10:53+5:30
भिवंडीत काँग्रेसचा महापौर बसू नये, याकरिता जंगजंग पछाडलेल्या भाजपाचा अखेर मुखभंग झाला असून, आपल्या पुतण्याला
पंढरीनाथ कुंभार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडीत काँग्रेसचा महापौर बसू नये, याकरिता जंगजंग पछाडलेल्या भाजपाचा अखेर मुखभंग झाला असून, आपल्या पुतण्याला महापौरपदी बसवण्याचे खासदार कपिल पाटील यांचे स्वप्न भंगले आहे. काँग्रेसला भक्कम जनाधार लाभल्याने त्यांच्यापुढील सत्तेचे ताट ओढून घेता येत नाही, हे पाहिल्यावर भाजपाने सतत कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेत फूट पाडून आपल्या मित्रपक्षाला धक्का देण्याचे मनसुबे रचले होते. मात्र, तेही फलद्रुप झाले नाहीत.
काँग्रेसला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतरही त्या पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेला सोबत घेतले. मागील वेळी भिवंडीत काँग्रेस व शिवसेना हे भिन्न जातकुळीचे पक्ष सत्तेत होते. राज्यात सत्ता असलेला भाजपा काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची भाषा करत होता आणि त्यांनी तसे काही केले, तरी जनमताचा कौल मिळूनही महापौर पराभूत होऊ नये, याकरिता काँग्रेसने शिवसेनेचा हात घट्ट धरला. त्यामुळेच महापौरपदी काँग्रेसचे जावेद दळवी, तर उपमहापौरपदी मनोज काटेकर हे विजयी झाले. देशभर सत्ता असलेल्या भाजपाच्या डोळ्यांत भिवंडीसारख्या छोट्या शहरातील काँग्रेसची सत्ताही खुपत आहे.
फाटाफुटीत अपयश
महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ४७, शिवसेनेचे १२, समाजवादीचे २ व अपक्ष १ अशा एकूण ६२ नगरसेवकांची मते मिळाली, तर भाजपाच्या उमेदवाराला भाजपाचे १९, कोणार्कचे ४, आरपीआयचे ४ व अपक्ष १ अशी एकूण २८ मते मिळाली.
शिवसेनेत मतभेद : उपमहापौरपद आपल्याला मिळावे, अशी इच्छा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मदन कृष्णा नाईक यांची होती. शिवसेनेतील काटेकर व नाईक या मतभेदांचा फायदा उठवत शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपाने अखेरपर्यंत करून पाहिला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर नाईक यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यांनी मनोज काटेकरांना धड शुभेच्छाही दिल्या नाहीत. शिवसेनेतील रुसव्याफुगव्यांचे दर्शन साऱ्यांना घडले.