भाजप सरकारने मराठयांचा विश्वासघात केला, भारिप प्रदेशाध्यक्षांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 01:46 PM2018-08-05T13:46:56+5:302018-08-05T13:47:15+5:30
मराठयांच्या आरक्षणाचा निर्णय झालेला असतानाच भाजप सरकारने त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सुमारे 17 महिने लावले. त्यामुळेच मराठयांचे आरक्षण कोर्टात रेंगाळत पडले.
ठाणे - मराठयांच्या आरक्षणाचा निर्णय झालेला असतानाच भाजप सरकारने त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सुमारे 17 महिने लावले. त्यामुळेच मराठयांचे आरक्षण कोर्टात रेंगाळत पडले, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केला. दरम्यान, काँग्रेसशी आघाडीची चर्चा सुरु असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सोनोने यांनी सांगितले.
भारिप बहुजन महासंघाच्या मेळाव्याचे ठाणे येथील एनकेटी सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशोक सोनोने बोलत होते. यावेळी आमदार बाळाराम सिरस्कर, माजी आमदार हरिभाऊ भदे, ठाणे जिल्हा निरीक्षक रतन बनसोडे, कुशल मेश्राम, अमीत भुईगळ, डॉ. सुरेश शेळके, दशरथ भांडे, रााजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे, राजू मालवीय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अशोक सोनोने म्हणाले की, भारिपने सन 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 358 तालुक्यांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. या मेळाव्यांना मोठया संख्येने आंबेडकरी समुदाय प्रतिसाद देत आहे. त्यामुळेच पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात काँग्रेसशी बोलणी सुरु आहेत. काँग्रेसने आम्हास प्रस्ताव दिला आहे. आम्ही लोकसभेच्या 12 जागा मागितल्या असून या बारा जागांवर मराठा, ओबीसी, एससी, एसटी, मुस्लीम अशा सर्वच जातप्रवर्गातील उमेदवारांना उभे करण्याचा पक्षाचा मानस आहे. जर, ही बोलणी यशस्वी ठरली तर ठिक अन्यथा, आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत.
मराठा आरक्षणाबद्दल विचारले असता, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता मिळवताना खोटी आश्वासने दिली होती. आधीच्या आघाडी सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचे कायद्यात रुपांतर या सरकारने केले नाही. कोर्टामध्येही वेळेवर प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. त्यामुळेच मराठा समाजाला रस्त्यावर उतरावे लागले आहे, असा आरोप केला.